योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : अकोला शहरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचा अखेर सुखरूप शोध लागला आहे. मित्राच्या वाढदिवसासाठी घरातून बाहेर पडलेले हे तिघेही मुंबईपर्यंत पोहोचले होते. सिटी कोतवाली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि जलद शोधमोहिमेच्या आधारे केवळ काही तासांतच त्यांना भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला शहरात सोमवारी रात्रीपासून तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. आशिष, आदित्य आणि दर्शन (सर्वांचे वय 15) अशी या मुलांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ते मित्राच्या वाढदिवसासाठी घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेऊनही त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
कसा लागला शोध?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित शोधमोहीम हाती घेतली. रेल्वे स्टेशन, बसस्थानके आणि शहरातील प्रमुख ठिकाणी तपासणी सुरू असतानाच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि मित्रपरिवाराची चौकशी सुरू केली. तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलं शेगाव दर्शनासाठी घरून निघाली होती, पण ट्रेनमध्ये झोप लागल्यामुळे ती मुंबईपर्यंत पोहोचली.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात 13 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य, शाळेतील 'त्या' प्रकरणामुळे उचललं टोकाचं पाऊल! )
मुलांचा कसलाही मागमूस लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत होती, तसेच सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर करून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. तणावाचे वातावरण असताना सिटी कोतवाली पोलिसांनी वेळ न दवडता सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर तपास अधिक वेगाने सुरू ठेवला. याच दरम्यान, मुलांची शेवटची लोकेशन भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुलांची लोकेशन निश्चित होताच सिटी कोतवाली पोलिसांनी क्षणभरही वेळ न घालवता स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रेल्वे पोलीस (GRP/RPF) यांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. पोलिसांनी अतिशय शिताफीने कारवाई करत तिन्ही मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले. या पथकाने केलेल्या जलद आणि धडाकेबाज कामगिरीमुळे बेपत्ता झालेल्या मुलांना केवळ काही तासांतच शोधणे शक्य झाले.
( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
पोलीस पथक आता या मुलांना घेऊन अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये परतत आहे. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या संपूर्ण कारवाईमध्ये अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे PI शंकर शेळके, पोनि संजय गवई, पोनि शिरीष खंडारे, PSI गोपाल जाधव, PSI अनिल इंगोले, तसेच H.C. फिरोज खान, खुशाल नेमाडे, अमीर, अभिषेक पाठक, राज चंदेल, धीरज वानखेडे तसेच पथक तपास पथकातील पोलीस अंमलदार एएसआय महेंद्र बहादुरकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, शैलेश घुगे, यांनी आणि अन्य तपास पथकांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.
सध्या अकोला पोलीस या मुलांनी घराबाहेर कसे आणि का जायचे ठरवले, यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world