Solapur News: सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका बाजूला बारावीचा निकाल लागल्याचा आनंद असतानाच, त्याच रात्री एका उच्चशिक्षित होऊ पाहणाऱ्या तरुणीचे आणि तिच्या कुटुंबाचे स्वप्न रक्ताच्या थारोळ्यात संपले. संपत्तीच्या वादातून पोटच्या गोळ्यांनी आणि नात्यातील माणसांनीच रक्ताचे नाते विसरून हे भयानक कृत्य केल्याने परिसरात संतापाचं वातावरण आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच
या हत्याकांडातील सर्वात हृदयद्रावक बाजू म्हणजे प्रिया मस्के या तरुणीचा झालेला अंत. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या प्रियाने बारावीच्या परीक्षेत 68.63 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. घरची हलाखीची परिस्थिती असली तरी मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होऊन आईचे कष्ट दूर करायचे, असे स्वप्न ती पाहत होती. मात्र, निकालाच्याच दिवशी नियतीने तिच्यावर घाला घातला. आईला वाचवण्यासाठी गेलेल्या प्रियावर निर्दयीपणे वार करण्यात आले आणि एका उमद्या स्वप्नाचा शेवट झाला.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
संपत्तीच्या वादातून कुटुंबाचा अंत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे हत्याकांड संपत्तीच्या वादातून घडल्याचे समोर येत आहे. गायत्री मस्के, त्यांचा मुलगा आणि मुलगी प्रिया अशा तिघांचीही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण मस्के कुटुंब उद्ध्वस्त झाले असून बोरामणी गावावर शोककळा पसरली आहे. जमिनीचा किंवा पैशांचा वाद एका संपूर्ण कुटुंबाला संपवण्याइतपत टोकाला गेल्याने मानवी नात्यांमधील क्रूरता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
पप्पू मस्के पोलिसांच्या रडारवर
मस्के कुटुंबाच्या या तिहेरी हत्येमागे गायत्री मस्के यांचा दीर पप्पू मस्के याचे नाव समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू मस्के यानेच हे हत्याकांड घडवून आणल्याचा प्राथमिक संशय आहे. या घटनेनंतर तो फरार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करुन जीव घेणारा तो नराधम निघाला सराईत वासनांध; सख्खी पुतणीही होती शिकार )
या खुनाच्या गुन्ह्यात पप्पू मस्के याच्यासोबत आणखी काही साथीदार होते का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. भरवस्तीत आणि अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तिघांना संपवणे हे एका व्यक्तीचे काम असू शकते की यात मोठा कट आहे, या दिशेने तपास सुरू आहे. पोलिसांकडून संशयितांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे. लवकरच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world