संकेत कुलकर्णी
लग्नानंतर होणारा सासूरवास आजही अनेक महिलांच्या नशिबी आहे. त्यांचा होणार छळ किंवा अवहेलना थांबलेली नाही. अशा स्थिती अनेक महिला या सर्व काही सहन करून संसाराचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतात. तर काही महिलांना या जाच, त्रास, छळ असह्य होतो. त्यामुळे त्या टोकाचं पाऊल उचलतात. आपलं आयुष्य संपवून घेतात. पण मागे अनेक प्रश्न राहून जातात. अशीच एक गंभीर आणि तेवढीच धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथं घडली आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील खुळेवाडीमध्ये पायल शशिकांत रणदिवे ही विवाहीत महिला राहात होती. शशिकांत रणदिवे यांच्यासोबत तिने लग्न केले होते. तिने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे पायलचा नवरा आणि सासू सासर्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आहे. या तक्रारीवरून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आत्महत्या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी पायलच्या हातावर तिची सुसाईड नोट सापडली.
पायलने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न ही निर्माण होत आहेत. ती लिहीते की हसू झालं गं माझं. माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा. स्वप्न होतं गं. आज पर्यंत शांत बसले. पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते. सॉरी अशी सुसाईड नोट तिच्या हातावर आहे. या थेट तिने कोणाला ही ब्लेम केला नाही. पण तिचा रोख तिच्या सासरच्या लोकांकडे आहे असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पायलला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. शिवाय तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. याबाबत नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचे शव नातेपुते पोलीस ठाण्यात आणले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतरच तिच्या माहेरच्यांनी तिचे प्रेत घरी नेले आहे. याबाबत पायलच्या माहेरच्या व्यक्तींकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.