- ब्रिटिश युट्यूबर माइक ओकेने 5 दिवसांत नागालँड, काश्मीर, राजस्थान आणि केरळ येथे भेट दिली
- त्याने भारताला एकाच दृष्टीकोनातून पाहणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले
- माइकने भारतातील प्रगती, साक्षरता, हिमालयाचे सौंदर्य आणि केरळच्या आरोग्य व्यवस्थेचा उल्लेख केला
गेल्या काही काळापासून परदेशी व्लॉगर्सकडून भारताची प्रतिमा केवळ गर्दी, घाण आणि अव्यवस्थेपुरती मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, 29 वर्षीय ब्रिटिश युट्यूबर माइक ओके याने या 'हेट नॅरेटिव्ह'ला चोख प्रत्युत्तर दिले आहे. केवळ 5 दिवसांत नागालँड, काश्मीर, राजस्थान आणि केरळ अशा 4 राज्यांचा प्रवास करून त्याने भारताचे वैविध्यपूर्ण आणि वास्तववादी रूप जगासमोर मांडले आहे. शिवाय खऱ्या भारताची ओळख त्यांना जगाला करून दिले आहे. त्याच्या युट्यूबवरील व्हिडीओला ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माइकच्या मते, भारताला एकाच चष्म्यातून पाहणे ही मोठी चूक आहे. नागालँडमधील पारंपारिक संस्कृतीपासून ते काश्मीरमधील द्रासच्या उणे तापमानापर्यंतचा प्रवास त्याने अनुभवला. भारताची तुलना युरोपशी करताना तो म्हणतो, "केवळ पॅरिस पाहून जसा संपूर्ण युरोप समजून घेता येत नाही, तसेच एखाद्या गल्लीतील गर्दी पाहून भारतावर शिक्कामोर्तब करणे चुकीचे आहे. तो आपल्या व्हिडीओतून हे स्पष्ट पण सांगत आहे. लंडनहून आलेल्या या युट्यूबरचं नेटीझन मोठ्या प्रमाणात कौतूक करत आहेत.
अनेकांना केवळ झोपडपट्ट्या किंवा अस्वच्छ स्ट्रीट फूड दाखवून 'व्ह्यूज' मिळवायचे असतात. माइकने याला 'लो-हँगिंग फ्रूट' (सोपा मार्ग) असे म्हटले आहे. भारताची साक्षरता, प्रगती, हिमालयाचे सौंदर्य आणि केरळची प्रगत आरोग्य व्यवस्था हे देखील भारताचे अविभाज्य पैलू असल्याचे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. माइकने आपल्या प्रवासाची सुरुवात नागालँडमधून केली. ज्याला तो आपले 'दुसरे घर' मानतो. त्यानंतर त्याने जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक असलेल्या द्रासमध्ये (काश्मीर) थंडीचा अनुभव घेतला.
राजस्थानच्या जैसलमेरमधील वाळवंट आणि उंटाची सवारी त्याला पोस्टकार्डमधील चित्रासारखी वाटली, तर केरळच्या बॅकवॉटर्समध्ये त्याने हाऊसबोटचा आनंद घेतला. माइकच्या मते, भारताचे प्रत्येक राज्य एका स्वतंत्र देशासारखे आहे. जिथे भाषा, खाद्यसंस्कृती आणि विचार पूर्णपणे बदलतात. जर तुम्हाला राजस्थान आवडले नाही तर केरळला जा, तिथेही मन रमले नाही तर हिमालयात जा. पण भारताला नकार देऊ नका, असा सल्ला त्याने जागतिक पर्यटकांना दिला आहे.
माइकने व्हिडिओच्या शेवटी स्पष्टपणे सांगितले की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही लोक केवळ नकारात्मक बाजू दाखवतात. परंतु, भारतीय हिमालय हे नेपाळपेक्षाही सुंदर आणि शांत आहे. केरळच्या प्रगत आरोग्य सुविधा आणि साक्षरता दर भारताच्या प्रगतीची साक्ष देतात. विरोधाभासांनी भरलेला हा देश पर्यटनासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगत त्याने भारताची खरी आणि सुंदर बाजू मांडली आहे. भारताची प्रतिमा मलीन करणाऱ्या व्हिडिओंच्या गर्दीत, माइक ओके या युट्यूबरने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. 5 दिवसांत भारताच्या चार दिशांना भेटी देऊन त्याने इथल्या संस्कृतीच्या, हवामानाच्या आणि अनुभवांच्या थरांचे दर्शन जगाला घडवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world