निलेश बंगाले, प्रतिनिधी
श्रीलंकेत झालेल्या रोप-वेच्या अपघातात वर्ध्यातील एका भिक्षुंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एक वर्षाच्या धम्म विनयच्या साधनेसाठी गेलेले वर्ध्याच्या तळेगांव मानव विकास साधना आश्रमचे प्रफुल्ल वाकदरे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. 24 सप्टेंबरला, बुधवारी रात्री साधनेसाठी जात असतांना 13 भिक्षूंचा अपघात होऊन त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन विदेशी भिक्षू होते. तर वर्ध्यातील भिक्षू वाकदरे यांनी जीव गमावला आहे. दरम्यान वर्ध्याच्या तळेगांव आणि परिसरातील नागरिकांनी प्रफुल्ल वाकदरे यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे.
श्रीलंकेतील मेलसिरीपुरातील पानसियागामा येथील ना उयाना मठ (ना लियाना अरण्य सेनानाया) येथे झालेल्या केबल कार अपघातात मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. मृत भिक्षूंपैकी किमान दोन परदेशी नागरिक आहेत आणि त्यांचे मृतदेह गोकरेल्ला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. इतर भिक्षूंचे मृतदेह कुरुनेगाला शिक्षण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
अपघाताच्या वेळी मठात 13 बौद्ध भिक्षू केबल कारमधून प्रवास करी होते असे वृत्त आहे. केबल कारची केबल तुटून पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कुरुनेगाला रुग्णालयातील सूत्रांनी अदा डेराना यांना सांगितले की, मेल्सिरीपुरातील पानसियागामा येथील ना उयाना मठात (ना उयाना अरण्य सेनानाया) केबल कारची केबल तुटून खाली पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, काल रात्री (24) कुरुनेगाला येथील बौद्ध वन मठात झालेल्या अपघातावेळी केबल कारमध्ये सुमारे 13 बौद्ध भिक्षू प्रवास करीत होते. .