पोलीस होण्याचं स्वप्न, अकॅडमीत दाखलही झाला, मात्र प्रशिक्षणादरम्यान आकाशचा शेवट

आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्याची तयारी होती. मात्र पोलीस होण्याचं स्वप्न होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 1 min
जालना:

जालना पोलीस भरती अकॅडमीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज 23 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास जालन्यातील पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या वीस वर्षीय तरुणाचा मैदानावर धावत असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश इटकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील शेनगावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या 12 दिवसापूर्वीच तो जालन्यातील करियर अकॅडमीमध्ये भरती पूर्व प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता.

पोलीस होण्याचं स्वप्न बाळगून आकाश जालन्यातील अकॅडमीत दाखल झाला होता. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्याची तयारी होती. मात्र पोलीस होण्याचं स्वप्न होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी सातच्या सुमारास क्रीडा संकुलाच्या मैदानावर सराव करताना अचानक तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान पोलिसांकडून पंचनामा सुरू असून शवविच्छेदनाची पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.