आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम इथून ते नागरकुरलूनकडे जात होते. त्यावेळी यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्या गाडीला बसने जोरदा धडक दिली, त्यामुळे हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दुखा: चे वातावरण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुधाकर पठारे हे सध्या मुंबई पोलिसमध्ये कार्यरत होते. त्यांच्यावर पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी होती. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते देव दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळीच हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना समजली. त्यानंतर ते घटनास्थळी धावत गेले. त्यानंतर झालेल्या अपघाताची बातमी मुंबई पोलिसांना कळवण्या आली आहे.
सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणेचे रहिवाशी होते. पारनेर हा त्यांचा तालुका होता. आयपीएस होण्याअगोदर ते सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी.अॅग्री, एलएलबी असे होते. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले होते. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली होती. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर ते पोलिस खात्यातच रमले होते. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा या ठिकाणी काम केलं आहे.
या शिवाय अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई ही त्यांनी सेवा दिली. पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे ही ते कार्यरत होते. शिवाय पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर या महत्वाच्या ठिकाणी ते होते. पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी , तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता.या कारवायांमुळे ते ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांची नक्कीच आठवण काढली जाते.