जाहिरात

Mumbai News: सिंगापूरच्या'ट्री टॉप वॉक' प्रमाणे मुंबईत ही भटकंतीचा पहिला 'निसर्ग उन्नत मार्ग'

सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे.

Mumbai News: सिंगापूरच्या'ट्री टॉप वॉक' प्रमाणे मुंबईत ही भटकंतीचा पहिला 'निसर्ग उन्नत मार्ग'
मुंबई:

दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय 'निसर्ग उन्नत मार्ग' म्हणजेच एलिव्हेटेड नेचर ट्रेलच्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट म्हणजेच ट्री वॉक करण्याची संधी नागरिकांना या माध्यमातून मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून गिरगाव चौपाटी लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे.  या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवार, 30 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अभिजीत बांगर, उप आयुक्त शरद उघडे, उप आयुक्त यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, सहायक आयुक्त  मनीष वळंजू आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. या उन्नत मार्गाशी संबंधित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार विद्युतीकरणाची कामे तसेच वास्तुशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभाग अंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण 485 मीटर आणि रूंदी 2.4मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'सी व्हिविंग डेक' देखील बांधण्यात आला आहे.

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Wardha News : वर्ध्यातील 'या' गावात ग्रामस्थांचं वीज बिल शून्यावर, कशी साधली ही किमया?

या प्रकल्प अंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासह आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - 100 years of RSS : संघाचा राजकारणाशी संबंध आहे का? संघ अभ्यासकांचं काय आहे मत?

मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील याठिकाणी मिळणार आहे. लोकार्पणानंतर या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईकरांसाठी हे नवे दालन असणार आहे. तर पर्यटकांसाठी ही एक मेजवाणी असणार आहे.