Sunjay Kapur Property Dispute : संजय कपूरची 30000 कोटी रुपयांची संपत्ती आणि वारस हक्काचा वाद आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय. करिश्मा कपूरच्या मुलांनी आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागण्यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.
या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आता आपला निकाल राखून ठेवलाय. या वादात धक्कादायक आरोप-प्रत्यारोप झाले असून 30000 कोटी रुपयांच्या या अवाढव्य संपत्तीवर नेमका कोणाचा अधिकार असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
करिश्माच्या मुलांचे गंभीर आरोप
संजय कपूरच्या कौटुंबिक संपत्तीच्या वादात करिश्मा कपूरच्या मुलांनी कोर्टासमोर अत्यंत खळबळजनक दावे केलेत. आपल्या वडिलांचं मृत्यूपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
संजय जिवंत असतानाच त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये फेरफार करण्यात आले आणि ती बदललं गेलं, असे मुलांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अधिक तीव्र झाली असून मुलांनी आपल्या हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय.
( नक्की वाचा : Sunjay Kapur Will :संजय कपूर यांच्या मृत्युपत्रात 'डिजिटल घोस्ट'चा वावर? कथित मृत्युपत्रावर कोर्टात गंभीर दावा )
मृत्यूपत्रातील बदलांवरून संशय
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुलांच्या वतीने वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात महत्त्वाची बाजू मांडली. संजय कपूर जेव्हा आपल्या मुलासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर गेले होते, नेमक्या त्याच काळात मृत्यूपत्रात बदल करण्यात आले, असा युक्तीवाद त्यांनी केला.
विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने या मृत्यूपत्रामध्ये दुरुस्ती केली, त्याला संजयच्या निधनानंतर केवळ एक दिवसात कंपनीचा डायरेक्टर बनवण्यात आले. या योगायोगामुळे मृत्यूपत्रावर संशय अधिक बळकट झाल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले.
सापत्न आई प्रिया कपूरवर निशाणा
करिश्माच्या मुलांनी आपली सापत्न आई प्रिया कपूर यांच्यावर थेट आरोप केलेत. प्रियाने वसीयतीमध्ये हेराफेरी करून वडिलांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केलाय, असा दावा मुलांनी केलाय.
संजय कपूर यांनी आपल्याला संपत्तीत हिस्सा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मूळ वसीयतीतून आपले नाव गायब करण्यात आले, असे या मुलांचे म्हणणे आहे. या वसीयतीची फॉरेन्सिक तपासणी व्हावी अशी मागणी मुलांच्या वकिलांनी केलीय, मात्र प्रिया कपूर यांच्या वकिलांनी याला विरोध दर्शवलाय.
संजय कपूरच्या तीन लग्नांचा इतिहास
बिझनेसमन संजय कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. त्याने पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी केले होते, जे 4 वर्षे टिकले. त्यानंतर त्याने अभिनेत्री करिश्मा कपूरशी दुसरे लग्न केले, ज्यांच्यापासून त्याला समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. 2014 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2016 मध्ये ते अधिकृतपणे वेगळे झाले.
संजयने तिसरे लग्न प्रिया सचदेवशी केले होते. संजय आणि प्रिया यांना अजारियस नावाचा मुलगा आहे, तर सफीरा चटवाल ही त्यांची दत्तक मुलगी आहे. संजयच्या निधनानंतर आता या सर्व वारसांमध्ये 30000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून संघर्ष सुरू झालाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world