जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र निषेध नोंदवला. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ न्यायालयाने दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांनी कश्मीर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. 2019 नंतरचा हा सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयाने एकत्रितरित्या आणि औपचारिक पद्धतीने दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नक्की वाचा :पहलगाम हल्ल्यात हाफिज सईदचा हात, तपास यंत्रणांच्या हाती लागली मोठी माहिती
यापूर्वी, 26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरदेखील सर्वोच्च न्यायालयाने बळी गेलेल्यांप्रती संवेदना दाखवत श्रद्धांजली वाहिली नव्हती. सर्वोच्च न्यायालय महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचे मौन बाळगून आदरांजली वाहत असते.
नक्की वाचा: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी मदत
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निषेधाचा आणि मौन पाळण्याच्या निर्णयाचा प्रस्ताव न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांनी मांडला होता. न्यायमूर्ती भूषण गवई हे सध्याच्या घडीचे वरिष्ठ न्यायमूर्ती असून ते सरन्यायाधीशपदासाठीचे प्रबळ दावेदार आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना बुधवारी भारताबाहेर होते.
नक्की वाचा : 'दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नये,' भाजपाचा इशारा, राजकारण तापले!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची दृश्ये आणि फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. न्यायदान करणारे न्यायमूर्ती आणि न्यायालयातील अधिकारी, कर्मचारीही या घटनेने हादरले आहेत. या घटनेनंतर न्यायमूर्तींनी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तातडीने विचारविनिमय केला. या छोटेखानी बैठकीसाठी न्यायालयात उपस्थित असलेले सर्व न्यायमूर्ती एकत्र आले होते. या न्यायमूर्तींनी या हल्ल्याच्या निषेधाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला होता. दुपारी दोन वाजता सायरन वाजला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींपासून कर्मचाऱ्यापर्यंत आणि वकिलांपासून वादी-प्रतिवाद्यांपर्यंत सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगले.
या दुःखद घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले असून यात म्हटले आहे की, "भारताचे सर्वोच्च न्यायालय या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या निष्पाप जनांना क्रूरपणे आणि अकाली हिरावून घेतले गेले. सर्वोच्च न्यायालय शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी नागरिक लवकर बरे होवोत. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पर्यटकांवर झालेला या हल्ल्याचा सर्वोच्च न्यायालय तीव्र शब्दात निषेध करत आहे.