
Pahalgam Terror Attack: पहलगामजवळच्या बैसरन खोऱ्यात झालेला दहशतवादी हल्ला लश्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी गटाने घडवला होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये बहुतेक परदेशी नागरिक होते आणि त्यांना स्थानिक दहशतवाद्यांनी तसेच कश्मीरमधील त्यांच्या सक्रिय स्लीपर सेलने मदत केली, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व दहशतवादी 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्करचा प्रमुख हाफिज सईद याच्या थेट संपर्कात होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हाशिम मूसाने यापूर्वीही केला होता हल्ला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दहशतवाद्यांचे हे विशिष्ट मॉड्यूल कश्मीर खोऱ्यात अनेक दिवसांपासून सक्रिय होते. सोनमर्ग, बूटा पथरी आणि गांदरबल इथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे याच गटाचा हात असल्याचाही दाट संशय आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये बूटा पथरी येथे झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात भारतीय लश्कराच्या दोन जवानांसह चार लोकांचा बळी गेला होता. त्याच महिन्यात सोनमर्ग येथे बोगदा बांधणाऱ्या मजुरांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पहलगाम हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचाही संशयित आहे..

हल्लेखोर जुनैद
लश्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी आणि कुलगामचा रहिवासी जुनैद अहमद भट्ट याची सुरक्षा दलाच्या जवानांसोबत चकमक झाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला होता. त्याच्यासोबत असलेले दहशतवादी तेव्हा पळून जाण्यात यशस्वी झाले होते. हे दहशतवादी जवळच्या जंगलाचा फायदा घेत फरार झाले होते. आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये दिसून आलं आहे की कोणताही मोठा हल्ला झाल्यानंतर दहशतवादी जंगलात लपून बसतात आणि त्यांच्या म्होरक्यांकडून पुढचा आदेश मिळेपर्यंत शांत राहतात.
नक्की वाचा : भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?
पहलगाम हल्ल्यात हाफिज सईदची भूमिका काय?
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात लश्करचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याचा साथीदार सैफुल्लाह हे दोघे सातत्याने होते असा दाट संशय आहे. हे दोघे पाकिस्तानात बसून या दहशतवाद्यांना कया करायचे ते सांगत होते असे मानले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानची सेना आणि त्याची गुप्तचर संस्था इंटर-सर्विसेज इंटेलिजेंस (ISI) यांनीही वेळोवेळी मदत केली होती.
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशवाद्यांनी एकाच वेळी पाच जणांची हत्या केली, दोघांना खुल्या मैदानात गोळ्या घालण्यात आल्या तर इतरांना बैसरनच्या कुंपणाजवळ गोळ्या घालण्यात आल्या. हे लोकं कुंपण ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मारण्यात आले. जे कुंपण ओलांडून पळाले त्यांचा जीव वाचला. हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली होती.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी
जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक आहेत. हाशिम मूसा उर्फ सुलेमान, अली भाई उर्फ तल्हा आणि अब्दुल हुसैन ठोकर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. ठोकर हा काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला आणि त्यांना पकडून देण्यासाठी मदत करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
नक्की वाचा : देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध अनावर
सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी बैसरन जवळच्या जंगलात, दहशतवाद्यांच्या गटाने वापरलेले ठिकाण शोधून काढले आहे. या ठिकाणाचा शोध लागल्याने हे दहशतवादी काय करत होते याची माहिती मिळण्यास मदत होईल. भारतीय जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली असून ती तीव्र केली जाणार आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कसून प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून या दहशतवादी गटाचे नेटवर्क उद्ध्वस्त करता येईल. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world