जाहिरात

CJI :'तो भारताबाहेर कुठेही लपला असला तरी सोडणार नाही'; मुख्य न्यायाधीशांच्या भावाला फोन आल्याने मोठी खळबळ

Supreme Court Chief Justice Surya Kant: एका व्यक्तीने थेट मुख्य न्यायाधीशांच्या भावाला फोन करून कोर्टाच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

CJI :'तो भारताबाहेर कुठेही लपला असला तरी सोडणार नाही'; मुख्य न्यायाधीशांच्या भावाला फोन आल्याने मोठी खळबळ
Supreme Court Chief Justice Surya Kant: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत
मुंबई:

Supreme Court Chief Justice Surya Kant: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात सुनावणी दरम्यान त्यांचा रुद्रावतार दाखवला आहे. एका व्यक्तीने थेट मुख्य न्यायाधीशांच्या भावाला फोन करून कोर्टाच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी हरियाणा सरकारच्या वकिलांना कडक शब्दांत फटकारले असून संबंधित व्यक्तीवर अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. माझ्या भावाला फोन करून मला काय डिक्टेट करणार? अशा शब्दांत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला असून हा संपूर्ण प्रकार न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा ठरला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या कृष्ण पुनिया यांची मुले, नितीन आणि एकता पुनिया यांनी पीजी मेडिकल कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली होती. या दोघांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करत 'बौद्ध अल्पसंख्याक' प्रमाणपत्र मिळवले होते. 

या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी मेरठमधील एका अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची मागणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, तेव्हा मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने यावर गंभीर ताशेरे ओढले.

( नक्की वाचा : Ajit Pawar : राहुल गांधींची भेट आणि कर्नाटकमध्ये FIR! रोहित पवारांच्या खेळीवर मुख्यमंत्र्यांचं थेट उत्तर )

'नव्या प्रकारचा फ्रॉड' असा उल्लेख

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, हा एक नव्या प्रकारचा फसवणुकीचा प्रकार आहे. पुनिया कुटुंब हे जाट समुदायातील असून त्यांना सामान्य श्रेणीत स्थान दिले जाते. मग केवळ आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म कसा स्वीकारला, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. 

तुम्ही सर्वात समृद्ध समुदायांपैकी एक आहात, मग अल्पसंख्याकांचे अधिकार का हिरावून घेऊ इच्छिता, असा थेट प्रश्न मुख्य न्यायाधीशांनी विचारला. योग्यता आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवा, असे सांगत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

मुख्य न्यायाधीशांच्या भावाला फोन 

न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतर एका व्यक्तीने थेट मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या भावाला फोन केला. 'तुमच्या भावाने (CJI) असा आदेश कसा काय दिला?' असा जाब या व्यक्तीने फोनवर विचारला. 

या घटनेची माहिती मिळताच मुख्य न्यायाधीश सुनावणी दरम्यान भडकले. त्यांनी हरियाणा सरकारच्या वकिलांना विचारले की, त्या व्यक्तीची माझ्या भावाला फोन करण्याची हिम्मत कशी झाली? तो आता मला सांगणार का की मी काय आदेश द्यायला हवेत? मी गेल्या 23 वर्षांपासून अशा लोकांना हाताळत आहे. तो व्यक्ती भारताबाहेर कुठेही लपला असला तरी त्याला कसे शोधून काढायचे हे मला चांगले ठाऊक आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला.

वकिलांना दिली केस सोडण्याची सूचना

मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात इतकी आक्रमक भूमिका घेतली की, त्यांनी हरियाणा सरकारच्या वकिलांना या प्रकरणातून तात्काळ हटण्याची सूचना केली. एखाद्या प्रकरणातील व्यक्ती जर थेट न्यायाधीशांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत असेल, तर अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणे चुकीचे आहे, असे त्यांनी सुनावले. 

या घटनेमुळे कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्यांवर आता सर्वोच्च न्यायालय कोणती कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com