- भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या
- हल्लेखोरांनी कारचा पाठलाग करुन बिर्याणी खाण्यासाठी थांबलेल्या चंद्रनाथ रथ यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला
- हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू
Suvendu Adhikari PA Shot Dead: भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात सुवेंदु यांचे पीएस बुद्धदेव आणि कारचा चालकही जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे घडली आहे. या घटनेनंतर तणाव वाढला आहे. रथ यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत, पण त्यांच्याबाबत काही माहिती समोर आल्याचे म्हटले जात आहे. भाजपने या हत्याकांडासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. भाजप आमदार कौस्तव बागची यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या अटकेची मागणी केली आहे. दुसरीकडे टीएमसीने या घटनेचा निषेध केला आहे.
आतापर्यंत काय काय माहिती मिळाली?
1. कारचा बराच वेळ पाठलाग: मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ आणि बुद्धदेव यांच्या कारचा बराच काळ पाठलाग केला.
2. कारचा वेग कमी होताच गोळीबार: चंद्रनाथ आपल्या घरी जात होते. वाटेत बिर्याणी खाण्यासाठी गाडी थांबवली आणि त्याच वेळी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
3. हल्ला कसा झाला: पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोरांनी आधी विंडशील्डवर गोळी झाडली. त्यानंतर पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या.
4. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू: ही घटना मध्यमग्राममधील जेसोर रोडवर दोहरिया जवळ घडली. घटनेनंतर स्थानिक लोकांनी चंद्रनाथ यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोण होते चंद्रनाथ रथ?
सुवेंदु अधिकारी यांचे बंधू दिव्येंदू अधिकारी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, चंद्रनाथ रथ हे भवानीपूरमध्ये एजंट म्हणूनही काम करत होते. जेथे ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. चंद्रनाथ रथ हे आधी हवाई दलात होते. हवाई दलातील नोकरी सोडून ते सुवेंदु अधिकारी यांचे पीए झाले होते,असेही त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा : West Bengal: सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या! पाठलाग करुन अडवलं, गोळ्या झाडून संपवलं)
सुवेंदु अधिकारी काय म्हणाले?
आपले पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे. "दोन ते तीन दिवस रेकी करण्यात आली होती आणि हत्येचा पूर्ण प्लॅन तयार केला होता. हे 15 वर्षांच्या महा-जंगलराजचे परिणाम आहेत, भाजप येथील गुंडांना संपवण्याचे काम सुरू करेल" असेही त्यांनी नमूद केले.
#WATCH | North 24 Parganas | On his PA, Chandra shot dead in Madhyamgram, BJP leader Suvendu Adhikari says, "This is a pre-planned murder, and this is what DGP said. A recce was done for 2-3 days and a murdered was fully planned. The police initiated investigation... We are… pic.twitter.com/XqcQR8Vz8D
— ANI (@ANI) May 6, 2026
हल्लेखोरांबाबत काय माहिती आहे?
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हल्लेखोर कार आणि बाइकवरून आले होते. कारने आधी चंद्रनाथ रथ यांची कार थांबवली आणि त्यानंतर बाइकस्वारांनी गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, चंद्रनाथ रथ यांची कार सर्वात आधी डोलताला जवळील दोहरिया जंक्शनवर एका चारचाकी गाडीने अडवली. त्यानंतर एक बाइकस्वार तिथे पोहोचला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. कारमधील लोक गाडी तिथेच सोडून बाइकने पसार झाले.
पोलिसांनी सांगितले की, कार आणि बाइक दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट बनावट होत्या. डीजीपी सिद्ध नाथ गुप्ता यांनी सांगितले की, हल्ल्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करण्यात आली होती. वापरलेली नंबर प्लेट सिलिगुडीची आहे पण ती खोटी आहे. घटनास्थळावरून जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहेत.
VIDEO | Suvendu Adhikari's PA death: DGP Siddh Nath Gupta says, “We have started the investigation. We have seized a vehicle used in the crime, and it has been found that its number plate was tampered with. The number plate used belongs to a vehicle in Siliguri, but it is fake… pic.twitter.com/g8c91ti8Lg
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2026
हत्या पूर्वनियोजित होती का?
ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडवून आणले आहे, त्यावरून हत्येचा कट आधीच रचला गेल्याचे दिसून येते. बंगाल भाजपचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, हा एक नियोजित हल्ला होता. भाजप नेत्यांनी या हल्ल्यामागे टीएमसीला जबाबदार धरले आहे. काही नेत्यांनी थेट ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान टीएमसीने या घटनेचा निषेध करताना एक निवेदन जारी केले असून या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.
हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि हल्ल्यामागचा हेतू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रनाथ रथ हे सुवेंदु अधिकारी यांच्या जवळचे असल्यामुळे लक्ष्य करण्यात आले की हा एखाद्या मोठ्या राजकीय कटाचा भाग होता? याचा तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world