Telangana News: तेलंगणामधील निजामाबाद येथे एका महिलेने आपल्या आजारी पतीची कथितपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने पतीला कॅन्युलाद्वारे (Cannula) टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्रशांत (वय 35 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तो परदेशात काम करत होता. प्रशांतच्या आईने 1 जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, 30 जून रोजी त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली. मुलगा मायदेशी परत आला आणि त्याच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडले, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत आईने आपल्या सुनेवर संशय व्यक्त केला होता.
अनैतिक संबंधातून हत्येचा कट
पोलिसांना तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे असे समोर आले की, संध्या नावाच्या या महिलेचे अनिल नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनुसार संध्या आणि अनिल यांनी प्रशांतचा काटा काढण्यासाठी कट रचला, कारण त्यांना वाटत होते की पती त्यांच्या प्रेमसंबंधात सर्वात मोठा अडथळा आहे. हा थरकाप उडवणारा कट अंमलात आणण्यासाठी त्यांनी व्यंकट साई नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीची मदत घेतली.
(नक्की वाचा: Siya Goyal: अटक होणार हे सियाला होतं माहित, वाचण्यासाठी तिने लढवली होती नामी शक्कल, 'ते' गुपित उघड)
आधी छतावरून खाली ढकलले
ठरलेल्या योजनेनुसार, 29 जून रोजी साई हा प्रशांतच्या घरी गेला आणि त्याने त्याला दारू पाजली. यानंतर साई प्रशांतला इमारतीच्या छतावर घेऊन गेला आणि प्रशांतला छतावरून खाली फेकले. पण या घटनेत प्रशांतचा जीव वाचला, पण त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर संध्या आणि साई यांनी जखमी प्रशांतला उपचारासाठी आधी एका शासकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, पण नंतर ते त्याला पुन्हा घरी घेऊन आले.
(नक्की वाचा: केतन अग्रवाल हत्याकांडासारखी धक्कादायक घटना; 13 वर्षांनी मोठ्या प्रेयसीसाठी नवविवाहित पत्नीचा काढला काटा)
टॉयलेट क्लीनर आणि गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन दिले
दुसरीकडे प्रेमी अनिलच्या सांगण्यावरून संध्याने उपचारासाठी प्रशांतच्या हाताला लावलेल्या कॅन्युलाद्वारे त्याला टॉयलेट क्लीनर आणि गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन दिले. एवढेच नव्हे तर यानंतर संध्याने प्रशांतला बेडवरून खाली ढकलून दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पोलीस तपासादरम्यान तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे, त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे