जाहिरात

केतन अग्रवाल हत्याकांडासारखी धक्कादायक घटना; 13 वर्षांनी मोठ्या प्रेयसीसाठी नवविवाहित पत्नीचा काढला काटा

Gurugram murder case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू असतानाच, आता हरियाणातील गुरुग्राममधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.

केतन अग्रवाल हत्याकांडासारखी धक्कादायक घटना; 13 वर्षांनी मोठ्या प्रेयसीसाठी नवविवाहित पत्नीचा काढला काटा
Gurugram murder case: 25 वर्षांच्या अंकितचे 13 वर्षांनी मोठ्या रजनीशी प्रेमसंबंध होते.
मुंबई:

Gurugram murder case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू असतानाच, आता हरियाणातील गुरुग्राममधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. प्रेम आणि लग्नाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत एका पतीने आपल्या अवघ्या 3 महिने आधी लग्न झालेल्या पत्नीचा अत्यंत क्रूरपणे काटा काढला. आपल्यापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी या तरुणाने हे भयानक पाऊल उचलले. दोन्ही आरोपींनी मिळून रचलेला हा हत्येचा कट पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

काय आहे प्रकरण?

हरियाणातील मानेसर येथे राहणाऱ्या 25 वर्षीय अंकित भगत याचे त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या 38 वर्षीय रजनी देवी या महिलेसोबत गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. ते दोघे मानेसर बसस्थानकाजवळ एका भाड्याच्या खोलीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यादरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी अंकितचे लग्न 22 वर्षीय मधू नावाच्या तरुणीसोबत झाले. 

लग्न झाले तरी अंकितला त्याच्या प्रेयसीसोबतच राहायचे होते. त्यामुळे त्याने अवघ्या 3 महिन्यांतच आपल्या नवविवाहित पत्नीला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. या कटासाठी त्याने 2 महिने आधीच उत्तर प्रदेशातून एक पिस्तूल आणून प्रेयसीच्या खोलीत लपवून ठेवले होते.

( नक्की वाचा : Ketan Agrawal Murder ...चेतननं शिकवले कड्यावरून कसे ढकलायचे; सियासोबत केला 'इथं' सराव, धक्कादायक माहिती उघड )

बाथरूममध्ये कोंडला पत्नीचा मृतदेह

ठरलेल्या प्लॅननुसार, 21 मे रोजी अंकित आपल्या पत्नीला स्कूटीवर बसवून प्रेयसी रजनीच्या भाड्याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर अंकितने पत्नी मधू हिच्यावर गोळी झाडली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर दोघांनी मिळून मधूचा मृतदेह त्याच खोलीतील बाथरूममध्ये बंद केला आणि तिथून पळ काढला. 

मधू अचानक गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मानेसर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, 21 मे रोजी अंकित तिला स्कूटीवरून घेऊन गेला होता. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अंकितवर संशय ठेवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस जेव्हा 22 मे रोजी त्या भाड्याच्या खोलीपाशी पोहोचले, तेव्हा तिथून प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा बाथरूममध्ये मधूचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आरोपी पती आणि त्याच्या प्रेयसीचा शोध सुरू केला. हत्या केल्यानंतर दोघेही गुरुग्राममधून पळून हरिद्वार येथे लपले होते आणि तिथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.

नेपाळला पळण्याचा होता प्लॅन

अंकित आणि रजनी हे  दोघेही नेपाळला जाण्याचा प्लॅन करत होते, मात्र काही कामानिमित्त त्यांना लपत-छपत पुन्हा मानेसरला परतावे लागले. पोलीस आधीच त्यांच्या मागावर होते. ते मानेसरमध्ये आल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अंकित आणि त्याची प्रेयसी रजनी देवी या दोघांना अटक केली. पोलीस चौकशीत दोघांनीही मधूच्या हत्येची कबुली दिली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com