Thane News : नवं स्वप्न पाहण्यासाठी निघाले अन् एका क्षणात सर्व संपलं; खड्ड्यामुळे पतीसमोर पत्नीचा भीषण शेवट

ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

भूपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी

Thane News : ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यात दुचाकी गेल्याने ती घसरली आणि रस्त्यावर पडलेल्या महिलेला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू...

मृत महिलेचे नाव सुनिता अक्षयलाल पाल (वय 46) असे असून त्या ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे पती अक्षयलाल पाल यांच्यासह त्या भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. राहणाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली आणि घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले, तर सुनिता पाल या रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

नक्की वाचा - ग्रामस्थांनी मृतदेह खाली ठेवून काढला पळ, स्मशानभूमीत भीतीचं वातावरण; पुण्यात अचानक काय घडलं?

या मृत्यूसाठी कोण जबाबदार?

घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. दरम्यान, भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक काँक्रीट रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वारंवार अपघात घडत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
 


Topics mentioned in this article