रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane News : ठाणे ग्रामीण पोलीस दलात एका ९ वर्षाच्या श्वानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ८ वर्षांपासून बेली डॉबरमन प्रजातीच्या श्वानाने ग्रामीणमधील पोलिसांना अनेक प्रकरणात दिशा दाखवली होती. हिटस्ट्रोकमळे बेलीचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
दुपारी कामावरुन आली अन् उठलीच नाही...
२९ ऑक्टोबर २०१८ रोजी बेलीची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या ८ वर्षात चोरी, जबरी चोरी, खून या गुन्ह्यात तिने पोलिसांना दिशा दाखवली होती. हँडलर पोलीस हवालदार समीर डिके याच्यासह चंदीगड येथील राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात तिने गुन्हे अन्वेषणाचे ९ महिने प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. नुकत्याच २४ मे रोजी बेलीने टिटवाळा येथील खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना मदत केली होती. त्यानंतर साधारण दुपारी अडीचच्या सुमारात हे पथक ठाण्यात परतले. सायंकाळी ७ च्या सुमारास हँडलर समीर यांनी बेलीला इशारा केला. मात्र तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. बेलीच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. बेलीचा मृत्यू हिटस्ट्रोकमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इतर पोलीस प्राण्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नक्की वाचा - वसई-विरारमधील नागरिक दहशतीत! भटक्या कुत्र्यांचा 4 महिन्यांत 15 हजार जणांना चावा
बेलीच्या आठवणीत डॉग हँडलर समीर यांना शोक अनावर...
बेलीचे परळच्या बैल-घोडा पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, तरीही उष्माघातामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेलीच्या निधनाने डॉग हँडलर समीर डिके यांनी शोक व्यक्त केला. बेली चार महिन्यांची असल्यापासून तिला अंगाखांद्यावर खेळवलं. गुन्हे अन्वेषणासाठी तिची चांगली मदत झाल्याचंही समीर यांनी सांगितलं.