- तीन महिन्याच्या मुलीचं अपहरण सहा दिवसा पुर्वी मुंब्रा इथे झालं होतं
- अपहरण करणाऱ्या महिलेला शोधण्यासाठी थाणे पोलीसांनी बाजी लावली
- अपहरण करणाऱ्या महिलेचं नाव खैरुन्निसा मुजीब मोहम्मद आहे
रिझवान शेख
तीन महिन्याच्या मुलीचं अपहरण मुंब्र्यातून झालं होतं. हे अपहरण बुरखा घातलेल्या एका महिलेने केले होतं. विशेष म्हणजे हे अपहरण आईच्या समोरच झालं होतं. बाळाला आपल्या डोळ्या समोरून चोरण्यात आलं त्यामुळे आई ही शॉकमध्ये होते. अखेर पोलीस अगदी फिल्मी स्टाईलने सहा दिवसात या लहान बाळा पर्यंत पोहोचले. त्यांनी त्या बाळाची सुखरूप सुटका केली. ते बाळ आता त्याच्या आईच्या कुशीत सुरक्षित आहे. पण या बाळाचे अपहरणा मागचे धक्कादायक कारण आणि त्याचा तपासाचा अंगावर काटा आणणारा थरार ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितला.
मुंब्रा इथं राहाणारी 23 वर्षाची फर्जाना मन्सूरी ही आपल्या दोन मुलींसह बाजारात गेली होती. एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी मुलगी ही तीन महिन्यांची होती. खरेदी केल्यानंतर ती घरी येत होती. त्याच वेळी तिच्या मोठ्या मुलीने मला ही उचलून घे असा हट्ट धरला. त्याच वेळी तिच्या सोबत एक बुरखाधारी महिला होती. रस्ता ओलांडण्यासाठी मदत करते असं सांगत तीने फर्जानाकडील लहान बाळ आपल्या ताब्यात घेतलं. फर्जानाने रस्ता ओलांडला पण त्या महिलेने ओलांडला नाही. तिन तिथून रिक्षा पकडत पळ काढला. या घटनेनं त्या बाळाची आई हादरली. तिने थेट पोलीस स्थानक गाठले.
नक्की वाचा - Thane News: आईच्या कुशीतून 3 महिन्यांची चिमुकली पळवली, थरारक घटना CCTV मध्ये कैद
पोलीसांकडे काहीच लीड नव्हते. ती ज्या रिक्षातून पळून गेली त्याचा नंबर ही माहित नव्हता. फक्त रिक्षाच्या मागे आई लिहीले होते. त्यावरून त्या रिक्षाचा शोध घेण्यात आला. रिक्षा चालकाने त्या महिलेला आपण मुंब्रा रेल्वे स्थानकात सोडल्याचे सांगितले. त्यानंतर ती बुरखाधारी महिला बदलापूरच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यावर मुंब्रा ते बदलापूरपर्यंतचे सीसीटीव्ही चेक करण्यात आली. बदलापूरला जी महिला उतरली तिची चौकशी करण्यात आली. पण अपहरण करणारी ती महिला नव्हती. त्यामुळे पोलीसाचे टेन्शन आणखी वाढले.
त्यांनी नव्याने तपास सुरू केला. सीसीटीव्ही पुन्हा एकदा चेक केले गेले. त्यात त्यांना एक महिला दिसली. तिच्याकडे लहान बाळ होते. तिच्या सोबत एक पुरूष ही होता. काही वेळाने एक महिला तिला येवून भेटून गेली. मग अपहरण करणारी महिला आणि पुरूष सीएसटीकडे गेले. ठाण्यानंतर ते गायब झाले. त्यांचा काही पत्ता लागला नाही. मग पोलीसांनी जी महिला त्यांना स्टेशनवर भेटून गेली होती तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. 1600 सीसीटीव्ही पडताळून पाहाण्यात आले. ती ज्या भागात राहत होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते. तिथे खबऱ्यांच्या मदतीने पोलीस पोहोचले. त्यांनी त्या महिलेची चौकशी केली मग सर्व सत्य एका क्षणात समोर आले.
त्या महिलेने आपण स्टेशनला भेटायला गेलो होतो हे कबुल केले. जिने लहान मुलीचे अपहरण केले होते तिचे नाव खैरुन्निसा मुजीब मोहम्मद असे असल्याचं तिने सांगितले. तर मोहम्मद मुजीर गुलाब असं तिच्या पतीचं नाव असल्याचं ही संबंधीत महिलेने चौकशीत सांगितलं. आपल्याला आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून खैरुन्निसाने बोलवल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी तिने बाळ दाखवलं. मग ती निघून गेली. ती अकोल्याची राहाणार असल्याची माहिती ही दिली. त्यानंतर पोलीसांची एक टीक अकोल्याला रवाना झाली. तिथून बाळासहीत अपहरण करणाऱ्या जोडप्याला अटक करण्यात आली. दहा वर्षापासून बाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी हे बाळ पळवल्याचं कबुल केलं. सहा दिवसानंतर हे बाळ पोलीसांच्या मदतीने आईच्या कुशीत पुन्हा विसावलं.