- मुंब्रा इथं फरझाना मन्सुरी यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
- अनोळखी महिलेने रस्ता पार करायला मदत करण्याच्या बहाण्याने चिमुकली आफियाला पळवून नेले
- त्या महिलेने तिथून रिक्षातून त्वरित पळ काढला
रिझवान शेख
ठाण्यातील मुंब्रा येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या कुशीत असलेली केवळ 3 महिन्यांची चिमुकली पळवून नेण्याची घटना समोर आली आहे. रस्ता पार करून देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी महिलेने ते बाळ पळवून नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर या लहान बाळाची आई अक्षरशः हादरून गेली आहे. आपल्या डोळ्या समोर आपल्या पोटचा गोळा पळून नेला त्यामुळे ती हताश झाली आहे. या प्रकरणी पोलीसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता या चिमुकलीचा शोध घेत आहेत.
फरझाना मन्सुरी या मुंब्रा येथील खडी मशीन रोड, अजमेरी टॉवर इथे राहता. 22 वर्षाच्या फरझाना मन्सुरी यांना दोन मुली आहेत. एक मुलगी तीन महिन्याची आहे. तर दुसरी मुलगी ही तीन वर्षांची आहे. या दोन्ही मुलींना घेवून त्या 22 जानेवारीला संध्याकाळी बांगड्या खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तीन महिन्याची आफिया त्यांच्या कुशीत होती. तर दुसऱ्या मुलीचा त्यांना हात धरला होता. त्यांनी बांगड्या ही मार्केटमधून खरेदी केल्या. त्यानंतर त्या घरी परतत होत्या.
त्याच वेळी त्यांची दुसरी तीन महिन्याच्या मुलीने त्यांच्याकडे उचलून घेण्याचा हट्ट धरला. अशा वेळी दोन्ही मुलींना एकाच वेळी कुशीत घेऊन रस्ता ओलांडणे फरझाना यांना शक्य नव्हते. याच क्षणी एका अनोळखी महिलेनं फरझानाकडे येत “मी बाळाला धरते, तुम्ही रस्ता पार करा,”असे सांगितले. फरझानाने विश्वास ठेवून 3 महिन्यांची चिमुकली आफिया त्या महिलेकडे दिली. त्यानंतर मोठ्या मुलीला घेऊन तिने रस्ता ओलांडला. पण फरझाना रस्ता ओलांडते तोच त्या महिलेने त्या लहान बाळासह रिक्षातून पळ काढला. तिच्या डोळ्या समोर तीन महिन्याची मुलगी गायब झाली होती.
रस्ता ओलांडल्यानंतर फरझानाने मागे वळून पाहिले असता ती महिला बाळासह दिसून आली नाही. यानंतर फरझानाचा आणि कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशनवरील कॅमेऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. बाळाचे आजोबा फिरोज मन्सुरी यांनी सांगितले की, घटनेच्या त्याच रात्री पोलिसांनी ऑटो रिक्षा चालकाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्या चालकाने संबंधित महिलेला मुंब्रा रेल्वे स्टेशनवर सोडल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार शोध सुरू आहे.