जाहिरात

मी जाईपर्यंत कोर्टातून बाहेर जायचं नाही! उज्ज्वल निकमांनी आवाज चढवताच संजय दत्त जागीच थिजला

Ujjwal Nikam scolds Sanjay Dutt: 93 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त हा हायप्रोफाईल आरोपी होता.

मी जाईपर्यंत कोर्टातून बाहेर जायचं नाही! उज्ज्वल निकमांनी आवाज चढवताच संजय दत्त जागीच थिजला
मुंबई:

Ujjwal Nikam scolds Sanjay Dutt: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदावारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि उज्ज्वल निकम यांचे खासदार बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. कोर्टामध्ये असताना उज्ज्वल निकम यांचा दरारा असतो. उज्ज्वल निकम ज्या खटल्यामध्ये सरकारतर्फे बाजू मांडतात त्या प्रकरणात आरोपींना शिक्षा होतेच असा विश्वास अनेकांना आहे. 93 चे मुंबई बॉम्बस्फोट असो अथवा कसाबविरोधात चालवलेला खटला. निकमांच्या प्रभावी युक्तिवादाने आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात सरकारला यश आले होते. 93 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त हा हायप्रोफाईल आरोपी होता. तो सहज सुटेल असा दावा केला जात असताना निकमांनी साक्षीपुराव्यांच्या आधारे संजय दत्त हा कसा गुन्हेगार आहे हे कोर्टाला पटवून दिलं, ज्यामुळे संजय दत्तला 5 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. याच संजय दत्तवर उज्ज्वल निकम एकदा भयंकर संतापले होते. हा सगळा प्रसंग कोर्टाच्या आवारातच घडला होता. 

मुंबईतीलआर्थर रोड तुरुंगात विशेष टाडा न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. न्यायाधीश प्रमोद कोदे रोज या प्रकरणाची सुनावणी घेत होते. ज्या आरोपींना 93 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळाला नव्हता, त्यांना आर्थर रोड तुरुंगातून आतल्या मार्गाने कोर्टात आणले जात होते. तुरुंगातील बराकीत हे कोर्ट स्थापन करण्यात आले होते. जामिनावर असलेले सगळे आरोपी याच कोर्टात येत होते,ज्यामध्ये अभिनेता संजय दत्तही होता. संजय दत्त याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने पाठवलेल्या शस्त्रास्त्रांपैकी ए.के.56 रायफल आपल्याजवळ ठेवल्याचा आरोप होता.  

संजय दत्त जेव्हा कोर्टात यायचा तेव्हा साहजिकच कोर्टाबाहेर माध्यमकर्मींची मोठी गर्दी व्हायची. आंतरराष्ट्रीय मीडियादेखील या खटल्याचं वार्तांकन करत होता. कोर्टात घडणाऱ्या घडामोडींबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे माध्यमांना रोज माहिती द्यायचे. खटल्याचे कामकाज संपले की मराठी, हिंदी आणि इंग्रजीत ते माध्यमांशी संवाद साधायचे. त्यांच्या पाठोपाठ आरोपींचे वकीलही माध्यमांशी बोलायचे.  

एकदा खटल्याचे काम संपल्यानंतर संजय दत्त बाहेर आला, त्याला पाहताच साहजिकच सगळी माध्यमे त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी तसेच बाईट घेण्यासाठी धावली. संजय दत्त बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांनी उज्ज्वल निकमही बाहेर पडले आणि सवयीनुसार त्यांची पावले मीडिया स्टँडकडे वळली. मात्र माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरे नसल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तिथे उपस्थित पोलिसांनी सांगितलं की मीडिया संजय दत्तच्या मागे धावला आहे. उज्ज्वल निकम यांनी माध्यमकर्मी परत यायची वाट पाहीले, ते आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते तिथून निघून गेले. मात्र घडला प्रकार त्यांना अजिबात आवडला नव्हता. 

पुढच्या सुनावणीसाठी संजय दत्त कोर्टात आला होता. त्याला पाहताच निकम यांनी त्याला बोलावले. आणि त्याच्याकडे बोट रोखून धरत त्याला बजावले की "“संजू, जब तक मैं निकल नहीं जाता तब तक तू कोर्ट से बाहर नहीं आयेगा। समझ गया?” संजय दत्तला काहीतरी चुकीचे झाल्याची जाणीव झाली आणि त्याने नम्रपणे “जी, सर। बिलकुल नहीं आऊंगा।” असं म्हटलं. निकम संतापलेले पाहून संजय दत्त काहीसा घाबरलेला होता, आणि त्याला फुटलेला घाम हा त्याचा मोठा पुरावा होता. खटला सुरू असताना आणि आपले भवितव्य काय आहे हे माहिती नसताना निकम संतापणे हे आपल्यासाठी योग्य नाही याची त्याला जाणीव होती.  

93 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त याला विशेष टाडा न्यायालयाने 6 वर्षांची शिक्षा सुनावली होती. टाडा कायद्याअंतर्गत दहशतवादी हा शिक्का त्याच्यावर बसता बसता वाचला होता. शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी मात्र त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा 1 वर्षाने कमी करून 5 वर्ष केली होती. ही शिक्षा भोगून संजय दत्त येरवडा तुरुंगातून अखेर मुक्त झाला.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com