अकोल्यात उद्योगपतीच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला, 2 कोटींचा मुद्देमाल लंपास

बंगल्याच्या मागची खिडकी तोडून चोरटे आत शिरले आणि त्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिना आणि रोखरक्कम असं मिळून दोन कोटींचा मुद्देमाल पळवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला पोलीस घटनास्थळावर चौकशी करत असताना
अकोला:

अकोला शहरात मध्यरात्री दरोड्याची मोठी घटना समोर आली आहे. गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठीत उद्योगपतीच्या बंगल्यावर चोरट्यांनी रात्री डल्ला मारत तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. ब्रिजमोहन भरतीया असं या उद्योगपतीचं नाव आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ उडाली आहे.

कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी डाव साधला -

मिळालेल्या माहितीनुसार, भरतीया कुटुंब रात्री झोपेत असताना चोरट्यांनी आपला कार्यभाग साधला आहे. बंगल्याच्या मागची खिडकी तोडून चोरटे आत शिरले आणि त्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिना आणि रोखरक्कम असं मिळून दोन कोटींचा मुद्देमाल पळवला आहे.

काही दिवसांपूर्वीच अकोल्यात घडली होती घरफोडीची घटना -

दोन दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री अकोला येथील आलेगाव भागात तीन घरांमध्ये चोरीची घटना घडली होती. या घरांतूनही चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांत प्रतिष्ठीत उद्योगपतीच्या घरावर दरोडा पडून कोट्यवधी रुपये पळवण्यात आल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

हे ही वाचा - 'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात, मला लटकवण्याचा प्रयत्न'

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु -

उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर, खदान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अधिक्षक बच्चन सिंग हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. खदान पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आजुबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासत आहेत. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली असून श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article