रॅली जरांगेंची, मजा चोरांची; अवघ्या काही तासात 9 लाखांचा ऐवज गायब

चोरीच्या घटनांमध्ये 9 लाखांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा अंदाज आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुण्यात रविवारी शांतता रॅली काढली. या रॅलीला प्रचंड गर्दी झाली होती. या रॅलीत चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट पाहायला मिळाला. पुण्याच्या रॅलीमध्ये चोरट्यांनी हात साफ करताना तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल चोरला अनेकांचे मोबाईल फोन, सोन्याच्या चेन, आणि रोख रक्कम चोरून नेलीय या संदर्भातल्या वेगवेगळ्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यायत.  चोरीच्या घटनांमध्ये 9 लाखांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा अंदाज आहे. 

हे ही वाचा: जरांगे पाटलांकडून सतत होत असलेल्या हल्ल्यावर फडणवीसांनी सोडलं मौन!

बाजीराव रोडवरच्या फुटका बुरुजाजवळ एका तरुणानं प्रणय पळसकर यांच्या गळ्यातून 92 हजार किमतीची सोनसाखळी हिसकावलीय. पळसकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तर सारसबाग परिसरामध्ये प्रकाश सूर्यवंशी यांची 85 हजारांची सोनसाखळी चोरांनी हिसकावलीय. स्वारगेट परिसरातल्या जेधे चौकात चोरट्यानं बाळासाहेब पिलावरे यांच्या खिशातून तब्बल 57 हजार 500  रुपयांची रोख रक्कमेवर डल्ला मारला.यासंदर्भात पिलावरे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. तर सत्यवान जगताप यांची तब्बल 3 लाख 30 हजार किंमतीची सोनसाखळी चोरीला गेली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारलाय. आता या चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

हे ही वाचा: भुजबळांचं ओपन चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं

याआधीही जरांगेंच्या जालन्यातल्या रॅलीतही चोरट्यांनी हात साफ केला होता. या सभेतही मोबाईल, सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. एवढंच नव्हे तर काही दुचाकीही या रॅलीमधून चोरीला गेल्याची तक्रार होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांसह जरांगेंच्या सभाही होणार आहेत. अशा सभांमध्ये चोरांचा बंदोबस्त करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.