अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli News : साधूच्या वेशात लोकांना लूटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. राहूल भाटी, आशीष मदारी, लखन निकम अशी तीन भामट्यांची नावे आहेत. डोंबिवलीतील एका आजोबांना त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली करुन देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडून त्यांच्याजवळचे महागडे दागिने घेऊन पसार झाले. मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचे बिंग फोडले. पोलिसांनी या भामट्यांकडून लूटलेले दागिने एका महागडी कार जप्त केली आहे. या तिघांनी महाराष्ट्र, गुजरात आणि देशातील अन्य शहरातील असा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेतील खोणी पलावा परिसरात राहणारे 75 वर्षांचे माधव जोशी भाजी खरेदी करण्यासाठी बुधवारी सकाळी घराबाहेर पडले. घराच्या काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला एका कारमधून एका बाबाने त्यांना हाक मारली. फूटपाथवर चालत असलेले माधव जोशी थांबले. कारमध्ये दोन साधू बाबा बसलेले होते. एका साधू बाबाने माधव जोशी यांचा हात त्याच्या हातात घेतला. तुमच्या घरात अनेक समस्या आहेत. लवकरच या समस्या दूर होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका असे सांगत त्यांच्या जवळील सोन्याची अंगठी आणि चैन घेऊन टाकली.
माधव जोशी काही विचार करण्यापूर्वीच ते तिघे कार घेऊन पसार झाले होते. आपल्या सोबत फसवणूकीचा प्रकार झाला आहे हे कळताच माधव जोशी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साह्यानं तपास केला. त्यामध्ये त्यांना वाहनाचा नंबर मिळाला. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासामध्येच भामट्या साधू बाबांना शोधून काढले. नवी मुंबई येथील खारघर येथून त्यांना अटक करण्यात आली.
( नक्की वाचा : Vishal Gawli : 'विशाल गवळीची जेल प्रशासनानं हत्या केली', आईचा आरोप, कोर्टात घेणार धाव )
या तिघापैकी राहूल भाटी हा गुजरातचा राहणारा आहे. आशिष मदारी हा भिवंडीचा राहणारा आहे. लखन निकम हा सोलापूरचा येथे राहणारा आहे. या तिघांनी मिळून सोलापूर, गुजरात अन्य राज्यात देखील साधूची वेषभूषा करुन अनेकांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास मानपाडा पोलिस करीत आहेत.