Nagpur Crime: गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळलेल्या तीन तरुणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांकडून तब्बल 15 महागडे स्मार्ट फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. श्रीमंत लोकांच्या कॉलनीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस वॉक करणाऱ्या लोकांना हे तिघेही जण नजर ठेवून असायचे. कानाला फोन लावून बोलण्यामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांना एकट्यात गाठायचे आणि दुचाकीवरून मागील बाजूने जाऊन शिताफीने त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढायचे, अशी त्यांची चोरी करण्याची पद्धत होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी सखोल तपासाअंती एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून चोरीची दोन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. गर्लफ्रेंड्सच्या मागण्या पुरवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळलेल्या या तिघांवर आता तुरुंगात जाण्याची वेळ ओढवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोबाइल चोरीची घटना कशी आली उघडकीस?
नागपूरमधील राज नगर परिसरातील रहिवासी सत्येंद्र शर्मा नेहमीप्रमाणे 22 मे रोजी संध्याकाळच्या वेळेस आपल्या वसाहतीत वॉक करत होते. वॉक करत-करत ते फोनवर बोलू लागले. शर्मांनी कानाला फोन लावलेलं पाहताच काही अंतरावर असणारे दुचाकीवरील दोन तरुण सतर्क झाले. शर्मा बोलण्यामध्ये पुरेसे गुंग झालेत, याची खात्री पटताच तरुणांनी दुचाकीचा वेग वाढवला आणि चालकाच्या मागे बसलेल्या तरुणाने झटका मारून त्यांचा मोबाइल हिसकावला. शर्मा यांना काही समजण्याच्याआतच दोघे पसार झाले.
(नक्की वाचा: केक भरवण्यावरून वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट)
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
सत्येंद्र शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचं घर शोधून काढलं. पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी थक्क करणारी माहिती सांगितली. हे तिघंही जण आपापल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी मोबाइल चोरीकडे वळल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
(नक्की वाचा: गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या)