पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव

Puja Khedkar : पूजा खेडकर यांच्या वडिलांनी तत्कालीन मंत्र्याला 2 कोटींची लाच दिली असा आरोप तक्रादार गंभीरे यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

वेगवेगळ्या गैरप्रकारामुळे वादग्रस्त ठरलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं राज्यातील प्रशिक्षण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. पूजा खेडकरच नाही तर त्यांच्या आई-वडिलांवरही गंभीर आरोप आहेत. पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.  या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा यांचे पती आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर या प्रकरणातले सहआरोपी आहेत. 

दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. या संपूर्ण प्रकरणात खेडकर यांच्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरु होती. दिलीप खेडकर यांच्या विरोधातील तक्रारदार तानाजी गंभीरे यांनी याबाबत बड्या नेत्यांवर आरोप केला आहे. गंभीरे यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बड्या नेत्यांचं नावं सांगितलं आहे. 

( नक्की वाचा : IAS पूजा खेडकरांना दणका, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली मोठी कारवाई )
 

काय म्हणाले गंभीरे?

दिलीप खेडेकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला असताना त्यांना वेगवगळ्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ते निलंबित होते. त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला. कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हा अधिकारी इतकं मोठं बेकायदेशीर कृत्य करु शकत नाही, असा दावा गंभीरे यांनी केला. 

रामदास कदमांच्या वरदहस्तामुळे दिलीप खेडकरांना पद मिळाल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. पद देण्यासाठी तत्कालीन मंत्र्याने 2 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तानाजी गंभीरे यांची तीन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. गंभीरे यांनी 2019 पासून खेडकरांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली. दिलीप खेडकरांच्या 8-9 कंपन्या असल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. 

Advertisement

( नक्की वाचा : पूजा खेडकर प्रकरणाला सनसनाटी वळण, तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दाखल होणार गुन्हा? )
 

खेडकर यांच्याकडं  8-10 आलिशान वाहनं आहेत. 14 विविध ठिकाणी जमिनी खेडकर कुटुंबाकडे जमिनी आहेत. या प्रकरणात ACB योग्य रितीनं तपास करत नसल्याचा आरोपही तानाजी गंभीरे यांनी केलाय.