Kolhapur News: देवाने वैकुंठाला जाण्याचा दिला आदेश, 20 जण करणार देहत्याग? नक्की प्रकार काय?

जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या महाराजाकडून त्यांनी दीक्षा घेतली आहे. त्यामुळे जेलमध्ये बसून भाविकांची माथी भडकवणारा महाराज आहे तरी कोण ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी

म्हणे परमेश्वराचं बोलावणं आलं. आता 8 सप्टेंबरला आम्ही देहत्याग करणार. परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे वैकुंठाला प्रयाण करणार. कर्नाटकच्या अनंतपुरात 20 भाविकांनी एकाच दिवशी एकाच वेळी देहत्याग करण्याची तयारी केली आहे. हे ऐकून तुम्हाल थोडं वेगळं वाटेल पण हे खरं आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. कर्नाटकच्या अथनीमध्ये 20 जण देहत्याग करण्याच्या तयारीत आहेत. देवाने वैकुंठाला जाण्याचा आदेश दिल्याचा दावा ते करत आहेत. विशेष म्हणजे जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या महाराजाकडून त्यांनी दीक्षा घेतली आहे. त्यामुळे जेलमध्ये बसून भाविकांची माथी भडकवणारा महाराज आहे तरी कोण ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.   

अनंतपूर गावात तुकाराम इरकर यांचं कुटुंब आहे. या कुटुंबाने जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या रामपाल महाराजाकडून दीक्षा घेतली आहे. घरात रामपाल महाराजाचा फोटो लावून सत्संग चालवतात. त्यांच्या घरात रामपाल महाराजाचा फोटो आहे.  त्याची गादी.. त्याच्या पादुका.. पादुका कसल्या चपलाच आहेत त्या. पण भाविकांसाठी त्या पवित्र आहेत. अशी सर्व व्यवस्था इरकर कुटुंबाने केली आहे. आता याच कुटुंबाला वैकुठाला जाण्याचा पहिला साक्षात्कार झाला आहे. 

नक्की वाचा - MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश

बर या भोंदूगिरीमध्ये आणखी 15 जण सहभागी झाले आहेत. यात मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले आणि सध्या पुण्यात राहत असलेले दहा जण आहेत. इतर पाच जण कर्नाटकच्या विजयपूरमधील भाविक आहेत. अशा या वीस जणांनी मिळून आठ सप्टेंबरला सामूहिक देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही बातमी पसरल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. तहसीलदार आणि पोलिसांनी थेट अनंतपूर गाव गाठलं. सुरुवातीला त्यांना वाटलं ही एखादी स्टंटबाजी असावी. पण भाविकांसोबत चर्चा केल्यानंतर भाविक खरंच देहत्याग करण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं. 

पोलिसांनी गावकऱ्यांच्या सोबतीने त्यांची समजूत काढली आणि पुण्याला पाठवलं. बरं ज्या रामपाल महाराजाकडून यांनी दीक्षा घेतली, त्याची थोडी माहिती जाणून घेऊयात.  हा रामपाल महाराज मूळचा हरियाणाचा आहे. सध्या तो हिसार सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. हरियाणामध्ये हा सतलोक आश्रम चालवायचा. 2014 मध्ये कोर्टाने एका प्रकरणात त्याच्या अटकेचे आदेश दिले. 18 नोव्हेंबरला पोलीस रामपालला अटक करण्यासाठी आश्रमात दाखल झाले होते. तेव्हा रामपालने स्वत:ला आश्रमात बंदिस्त करून समर्थकांचा वेढा दिला. पोलिसांनी आश्रमात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा समर्थकानी हल्ला केला. तब्बल तीन दिवस पोलीस आणि रामपालच्या समर्थकांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. शेवटी 20 नोव्हेंबरला पोलिसांनी रामपाल आणि 15 समर्थकांना अटक केली. या धुमश्चक्रीत पाच पोलिसांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये या प्रकरणात रामपाल महाराजला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Advertisement

नक्की वाचा - Political news: सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल! शिंदेंच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज?

असा हा स्वयंघोषित देव अवतार असलेल्या रामपाल महाराजाचा इतिहास आहे. जो आज जेलच्या एका कोठडीत कैदी नंबर 1005 चा ठप्पा घेऊन आयुष्य जगतोय. पण जेलमध्ये असूनही रामपालची भक्तमंडळी त्याला देवाचा अवतार समजतात.  त्याचे अपराध या भक्तांना लीला वाटतात. अशा या भक्तांनी रामपाल महाराजासाठी खास सोय केलीय.  चांदीचा मुलामा असलेली खास खुर्ची बनवून घेतलीय. रामपाल महाराजाकडून दीक्षा घेतलेलं इरकर कुटुंब रामपाल महाराजाची वाट बघतंय. जो महाराज जेलची हवा खातोय. तो कर्नाटकात येईल. त्यांना तीर्थ देईल आणि मग ते वैकुंठाला मार्गस्थ होतील, असा त्यांना विश्वास आहे. पण भाविकांचं वैकुंठाला जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार असं दिसतंय.