बेशुद्ध झाला तरी एसटी थांबवली नाही; प्रवाशाच्या मृत्यूनंतर बस आगारात गोंधळ

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळात निष्काळजीपणामुळे एका प्रवाशाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

संजय तिवारी, प्रतिनिधी

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळात निष्काळजीपणामुळे एका प्रवाशाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया-तुमसर-भंडारा या बसमध्ये देव्हाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला. तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली. तो बेशुद्ध पडल्यावर त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांनी सदर बस तातडीने रुग्णालयात नेण्याची विनंती बसवाहकाला केली. परंतु त्याने न ऐकता वाद घातला व एसटी थेट बसस्थानकात नेली. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एसटीचे चालक आणि वाहकांना काळीज आहे की नाही, असा प्रश्नही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - कुटुंबानेच आखला सरपंचांच्या खूनाचा कट; हत्येचा बनाव पाहून पोलीसही हैराण!

धावत्या बसमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव चुनीलाल राऊत (34) असून तो डोंगरला येथील रहिवासी आहे. प्रवासी मरणासन्न असताना वाहकाने एसटी रुग्णालयात न नेता बस स्थानकात नेली. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून अरेरावी करणाऱ्या चालक वाहकावर कारवाईची मागणी केली जात आहे. ही एसटी गोंदिया-तुमसर भंडारा असा फेरा करते. ती भंडारा आगाराची आहे. चालक व वाहकांना नेमकं काय घडलं याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. याबाबत भंडारा आगाराच्या व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती दिली असून योग्य कारवाई केली जाणार असल्याचं तुमसर आगार व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

धक्कादायक म्हणजे इतर प्रवाशांनी वाहकाला सांगितल्यानंतरही त्याने एसटी थांबवण्यास नकार दिला. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित तरुणाला वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.