Ulhasnagar News : उल्हासनगर हादरले: लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर मेहुण्याने झाडल्या गोळ्या

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्याच्याच मेहूण्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
उल्हासनगर:

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील साईनाथ कॉलनी परिसरात सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्याच्याच मेहूण्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात योगेश मिश्रा आणि त्याचा मित्र धीरज मिठाले हे दोघे जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

बुधवार (27 ऑगस्ट) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साईनाथ कॉलनीतील रहिवासी असलेले योगेश मिश्रा (भावोजी) आणि त्यांचा मित्र धीरज मिठाले हे सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्याचवेळी मोनू शेख (मेहूणा) आणि त्याच्या साथीदारांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात योगेशच्या छातीत गोळी लागली. गोळीबारानंतरही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

( नक्की वाचा : Arun Gawli : 'डॅडी' 18 वर्षांनंतर बाहेर येणार! शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन )

जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय

घटनेनंतर आरोपी मोनू शेख आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. जखमी योगेश आणि धीरज यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे जुना वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू आणि जखमी योगेश हे एकेकाळी एकत्र काम करत होते, मात्र नंतर त्यांच्यात वाद झाले. याशिवाय, योगेशने मोनूच्या बहिणीसोबत लग्न केल्याचा रागही त्याच्या मनात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. गोळीबार करणाऱ्या मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेतील जखमी आणि आरोपी अशा दोन्ही बाजूंच्या व्यक्तींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मोनूच्या अटकेनंतरच या हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article