नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मद्यपार्टी आयोजित केल्या जातात. त्यानंतर अनेक जण त्याच नशेत गाड्या चालवतात. त्यातून अपघाताच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. वारंवार याबाबत प्रबोधन करूनही तळीराम ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह करताना अनेक वेळा दिसतात. याला आळा घालता यावा यासाठी उल्हासनगर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतूकही होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक जण मित्रमंडळी, परिवारासोबत हॉटेल, बार, ढाबे अशा ठिकाणी जाऊन पार्टी करतात. त्या ठिकाणी मद्यपान ही केलं जातं. यानंतर दारू पिऊन गाडी चालवल्यानं अपघात होतात. ज्यात अनेकांना जीवाला मुकावं लागतं. अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. नव वर्षाच्या सुरूवातीलाच अशा घटना घडल्याने वर्षाची सुरूवात वाईट होते.
त्यामुळे हे अपघात आणि जीवितहानी टळावी, यासाठी उल्हासनगरात वाहतूक पोलिसांकडून अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. उल्हासनगर वाहतूक शाखेने दारूच्या बाटलीचा आकार तयार करत त्याच्यावर ड्राईव्ह सेफ हा संदेश दिला आहे. खुद्द सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार यांनी उपस्थित राहत वाहन चालकांचे प्रबोधन केले आहे. शिवाय ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडल्यावर काय कारवाई होते याची माहिती त्यांनी दिली.
ट्रेंडिंग बातमी - New Year 2025 : 5 कामांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, संपूर्ण वर्ष जाईल खास
कोणत्याही स्थितीत दारू पिऊन गाडी न चालवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनचालकांच्या हातात ड्राईव्ह सेफ लिहिलेला रिस्ट बँड घालून दारू पिऊन गाडी चालवू नका, असं आवाहन केलं. यावेळी ड्राईव्ह सेफ हा संदेश दिलेली दाऊची बाटली सर्वांचे लक्ष वेधत होती. त्यामुळे पार्टी करा. पण दारू पिऊन गाडी चालवू नका असं आवाहन सर्वांना करण्यात येत आहे.