Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर

Puja Khedkar : मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही, असा दावा निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसवा आयोगानं (UPSC) घेतला होता. त्यांच्यावर नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीनं केला होता. पूजा खेडकर यांनी युपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मला अपात्र ठरवण्याचा अधिकार यूपीएससीला नाही, असा दावा पूजा यांनी केलाय. पूजा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरामध्ये हा दावा केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय दिलं उत्तर?

आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केल्यानंतर अपात्र ठरवण्याचा कोणताही अधिकारी यूपीएससीला नाही. फक्त केंद्रीय कर्मिक (DoPT) मंत्रालयच मला अपात्र ठरवू शकते, असा दावा पूजा खेडकर यांनी या उत्तरात केला. 

यूपीएससची परीक्षा देताना नावात गडबड केल्याचा दावाही पूजा खेडकर यांनी फेटाळला आहे. 'मी 2012 ते 2022 या काळा नाव आणि आडनावात कोणताही बदल केलेला नाही. ही सर्व माहिती यूपीएससीच्या तपशीलवार अर्जात देण्यात आली आहे. 2019, 2021 आणि 2022 साली  व्यक्तीमत्व चाचणी देताना यूपीएससीने बायोमेट्रिक तपासणीद्वारे त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली होती. त्याचबरोबर 26 मे 2022 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीपूर्वीही सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती, असं पूजा यांनी या उत्तरात स्पष्ट केलं आहे. 

( नक्की वाचा : पुणे पोलिसांमध्ये खळबळ! आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल )

काय आहेत आरोप?

पूजा खेडकरांविरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन करणे हे आरोप होते. त्याचबरोबर पूजाने तब्बल बारा वेळा नावं बदलून परीक्षा दिली. मसुरीतही गैरवर्तणुकीचे आठ मेमो मिळाले होते.  इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिली.  परीक्षा देताना स्वतःचे वडील आणि आईचे नाव बदलले. 2022 साली ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतला. वडील सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग 1 अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ 8 लाखांपेक्षा कमी नव्हते, असा ठपका यूपीएससीनं ठेवला आहे. 

( नक्की वाचा : पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले )

दिल्ली हायकोर्टात या प्रकरणाची उद्या (गुरुवार, 29 ऑगस्ट) पुन्हा सुनावणी होणार आहे.  पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article