राहुल कांबळे, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील पागोटे गावात गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव आणि पोलीस यंत्रणेची मर्यादित कारवाई यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी पोर्ट, आणि वाढत्या शहरीकरणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना संधी मिळत आहे. मात्र, त्याचा थेट फटका सामान्य नागरिक, व्यापारी, कामगार व महिलांना बसत आहे.
टोळीचा उदय: 'लोकल दादा' पुन्हा सक्रीय
स्थानिक सूत्रांनुसार, 'लोकल दादा' नावाने परिचित असलेले काही इसम पागोटे परिसरात दहशत माजवत आहेत. खंडणी, मारहाण, शिवीगाळ, धमक्या आणि पोलिसांमध्ये हस्तक्षेप हे त्यांचे मुख्य कृत्य आहे. या पार्श्वभूमीवर पागोटे गावातील ग्रामस्थांनी उरण पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित गुन्हेगारांवर हद्दपारीची मागणी केली आहे.
मुख्य आरोपी कोण?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सौरभ दिलीप पाटील, किरण हरिभाऊ पंडीत हे दोघेजण गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करीत आहेत: या दोघांवर पूर्वीपासूनच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यांनी पागोटे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा - खैर तस्करीचे सत्र सुरूच; वनविभागाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मोठी तस्करी उधळली
- दोघांवर गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत .
- पंजाब कनेक्टर्स कंपनीतील कामगाराला मारहाण व जीव मारण्याची धमकी
- पागोटेतील L&T परिसरात स्थानिकांना धमकावून मारहाण
- दारूच्या नशेत फिर्यादी व त्याच्या आईवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न
'आम्ही तक्रारही करू शकत नाही' – स्थानिकांची व्यथा
पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही आरोपी उघडपणे परिसरात वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. “आम्हाला तक्रार द्यायलाही भीती वाटते. पोलिसांच्या नजरेसमोर गुन्हेगार फिरत आहेत. अशा परिस्थितीत गावात राहणं अवघड झालं आहे,”
कायदेशीर कारवाईची मागणी
गावकऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 56(1)(a)(b) नुसार हद्दपारीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कायद्यानुसार समाजविघातक व वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना निर्दिष्ट परिसरातून 2 वर्षांपर्यंत बाहेर काढण्याची तरतूद आहे. उरण, पनवेल, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्हा संपूर्ण भागातून आरोपींना हद्दपारीसाठी मागणी करण्यात आली आहे.
गुन्हेगारीमुळे गावकऱ्यांचे जीवन विस्कळीत
या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजात भीती, अस्थिरता आणि नैराश्याचं वातावरण आहे. काही कामगार गाव सोडण्याच्या तयारीत आहेत, व्यापाऱ्यांवर खंडणीचा दबाव आहे, महिला व ज्येष्ठ नागरिक भयभीत आहेत. पागोटे गावातील परिस्थिती ही फक्त गुन्हेगारीचा प्रश्न नसून, कायद्याच्या प्रभावावर उठलेला प्रश्नचिन्ह आहे. प्रशासनाने जर तातडीने पावले उचलली नाहीत, तर या टोळ्यांचा प्रभाव वाढत जाईल व भविष्यात गंभीर सामाजिक असंतोष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.