जाहिरात

Varsha Gaikwad Vs Muslim Leaders: वर्षा गायकवाडांच्या विधानावर मुस्लिम नेते भडकले, नेमके काय झाले ?

मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या मतांमुळे काँग्रेसला आपली ताकद प्रस्थापित करता आली होती आणि बराच काळ टीकवताही आली होती.

Varsha Gaikwad Vs Muslim Leaders: वर्षा गायकवाडांच्या विधानावर मुस्लिम नेते भडकले, नेमके काय झाले ?
मुंबई:

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या एका वक्तव्यामुळे पक्षाचे मुस्लिम नेते नाराज झाले आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार मौलाना ओबैदुल्ला खान आझमी यांनी तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहून गायकवाड यांची तक्रार केली आहे. वर्षा गायकवाड यांनी 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष मुक्त केल्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची आणि त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. मौलाना ओबैदुल्ला खान आझमी यांच्या मते, गायकवाड यांचे हे विधान काँग्रेसची या प्रकरणातील अधिकृत भूमिका मानले जात आहे आणि यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

11 जुलै 2006 रोजी मुंबईतील 7 लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे 200 लोक मारले गेले होते. या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 12 लोकांना अटक केली होती. 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने 5 आरोपींना फाशीची आणि 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपींनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टाने 21 जुलै रोजी तपासामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगत सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त केले.

गायकवाड यांच्या वक्तव्यावर टीका

हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनेक राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यात वर्षा गायकवाड यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेऊन आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी केली. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मौलाना आझमी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आझमी यांनी पत्रात म्हटले आहे की, "गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसला आहे आणि मुस्लिमांचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल." गायकवाड यांचे राजकीय कारकीर्द मुस्लिमांच्या पाठिंब्यामुळेच तयार झाल्याचा दावाही आझमी यांनी केला. आझमी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहीत गायकवाड यांच्या विधानाचा निषेध केला आहे. गायकवाड यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे का पक्षाची भूमिका हे स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  

वर्षा गायकवाड यांचा खुलासा

आझमी यांच्या आरोपांवर वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, त्यांनी कोणत्या एका धर्मासाठी म्हणून त्यांनी हे विधान केलेले नाही. त्यांनी म्हटले की आरोपी कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहीजे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली,  कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पाहीजे अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी म्हटले.  

मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या मतांमुळे काँग्रेसला आपली ताकद प्रस्थापित करता आली होती आणि बराच काळ टीकवताही आली होती. या वोट बँकेवर समाजवादी पक्षाचाही डोळा असून एमआयएम पक्षानेही या मतपेढीवर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशात वर्षा गायकवाड यांचे विधान आणि त्यावरून मुस्लिम समाजात निर्माण झालेली नाराजी ही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com