मनोज सातवी
संपत्ती हडपण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्ष दोन महिने नशा मुक्ती केंद्रामध्ये किडनॅप करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रमेश रामचंद्र पाटील असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे. अश्रफ शेख नावाच्या एका जमीन एजंटने शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्र यांच्याशी संगनमताने बळजबरीने पाटील यांना किडनॅप केले. त्यानंतर दोन ते तीन कोटी रुपयांची संपत्ती हडप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी रमेश पाटील यांनी मांडवी पोलीस ठाणे गाठले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रमेश पाटील हे भिवंडी तालुक्यातील मानिवली गावाचे रहिवाशी आहे. त्यांनी आपल्या जमिनीसंदर्भात व्यवहार करण्यासाठी एजन्ट अश्रफ शेख याला पॉवर ऑफ ॲटर्नी दिली दिली होती. रमेश पाटील यांनी 1/12/2022 रोजी हा करार केला होता. त्या बदल्यात 30 लाख रुपयांचे चेक आणि एक अंबाडी येथे 2BHK घर देण्याचा साठेकरार केला होता. मात्र, त्यानंतर 13/ 12/2022 रोजी अश्रफ शेख याने सांगितले, तू येऊन आम्हाला भेट. मी तुला तीन ते चार लाख रुपये रोख रक्कम देतो. असे सांगून फसवून पारोळ फाटा येथे बोलवले .
परंतु रमेश पाटील हॉटेल मध्ये चहा पीत असताना शुभ प्रभात फाउंडेशन काही माणसांनी येऊन त्यांना बळजबरीने पकडून गाडीत टाकले. त्यानंतर शुभ प्रभात फाउंडेशन येथे घेऊन गेले. तसेच, त्यावेळी रमेश पाटील यांच्याकडे असलेली 3 लाख रुपयांची रक्कम, जमिनी संदर्भाचे दस्तावेज, कायदेशीर अधिकारपत्राचा (Power of Attorney) हे सर्व घेऊन अश्रफ शेख आणि त्याचे साथिदार पसार झाले. तेव्हापासून 13/ 12/2022 पासून ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत रमेश पाटील हे शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्रात होते.
या दरम्यान त्यांना कोणत्याही नातेवाईकांसोबत भेटू तर दिल नाहीच, पण फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही. याच दरम्यान अश्रफ शेख या जमिनी एजंट ने पॉवर ऑफ ॲटर्नीचा गैरवापर करून रमेश पाटील यांची प्रॉपर्टी परस्पर विकून टाकल्याने रमेश पाटील हे घरासह, जमीन मालमत्ता गमावून बसले. वसई तालुक्यातील तिल्हेर गावात हे शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्र असून, या केंद्रामध्येमध्ये नशा मुक्ती केंद्र कमी आणि छळ छावणी जास्त अशी परिस्थिती आहे असा आरोप पाटील यांनी केला आहे.
वसई तालुक्यातील तिल्हेर गावातील शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्र म्हणजे एक छळ छावणी असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी 200 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. आम्ही या नशामुक्ती केंद्रात जाऊन प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. याच नशा मुक्ती केंद्रात मागच्या नोव्हेंबर महिन्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत तिल्हेर ग्रामपंचायत सरपंच काळुराम मेंगाळ यांनी माहिती दिली आहे.
याप्रकरणी आपल्याला न्याय मिळावा म्हणून पीडित रमेश पाटील यांनी मांडवी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन, सदर प्रकरणाची सविस्तर फिर्याद दाखल करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता रमेश पाटील आणि त्यांच्यासह शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्रामध्ये अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत खीतपत पडलेल्या रुग्णांना कशाप्रकारे न्याय मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.