मनोज सातवी, वसई: दोन शाळकरी मुलांवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना वसईमधून समोर आली आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नराधम आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांवर शाळेच्या सुरक्षा रक्षका कडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील 53 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. या सुरक्षा रक्षकाने शाळेतील दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ही मुले 15 वर्षे आणि 17 वर्षे वयोगटातील असून इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकत आहेत. या प्रकरणी संबंधित शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या व्यवस्थापकाने अर्नाळा सागरी पोलिसांत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सुरक्षा रक्षकाने दोन्ही विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या किचनमध्ये नेऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
Nagpur News: खेळण्यासाठी 2 चिमुकले घराबाहेर पडले, पण परत आलेच नाहीत, त्यांच्या सोबत काय झालं?
दरम्यान, पोलिसांनी तातडीने सुरक्षा रक्षकाचा शोध घेऊन त्याला लैंगिक छळ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.