मनोज सातवी
टाटा शो रूमध्ये उभी असलेली नवी कोरी कार चोरट्यांनी चोरली आहे. ही कार साधीसुधी नाही ही कार आहे टाटा पंच. याची किंमत सहा लाखापासून नऊ लाखापर्यंत आहे. पालघरच्या तलासरी तालुक्यातील इभाडपाडा इथल्या शोरूममधून ही कार चोरण्यात आली आहे. चोरीचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी ही कार लांबवली आहे. विशेष म्हणजे ही चोरी करण्यासाठी ते आले जुन्या कारमधून तर जाताना नव्याकोऱ्या कारमधून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाटा शोरूम मध्ये नवीन टाटा पंच कार होती. यावर चोरट्यांचे लक्ष होते. रात्री संधी साधायची आणि ही कार पळवायची असा त्यांनी प्लॅन केला होता. त्यानुसार दोन चोरचे रात्री दोनच्या सुमारास या टाटा शोरूमच्या जवळ पोहोचले होते. त्यावेळी ते एका जुन्या व्हॅगनार कारमध्ये आले होते. त्यांनी शो रूमच्या जवळ पोहोचल्यानंतर आजूबाजूला रेकी केली. कुणी नाही ना याची खात्री केली. त्यानंतर ते दोघेही त्यांनी आणलेल्या जुन्या व्हॅगनार कारमधून उतरले.
शोरूमला टाळे लावण्यात आले होते. त्यांनी त्या शोरुमच्या शटरचे टाळे तोडले. त्यानंतर दोघे ही शोरूममध्ये घुसले. आत मध्ये नवी कोरी टाटा पंच कार उभी होती. जणू काही ती त्यांचीच वाट पाहात होती. अशा अविर्भावात हे दोघे चोरटे कार घेऊन पसार झाले. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा हा 'कार'नामा येतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विशेष म्हणजे ज्या कारमध्ये चोरटे आले होते, ती कार देखील चोरीची होती. काही अंतरावर चोरट्यांनी जुनी कार सोडून दिली होती. त्यानंतर नवीन कार घेऊन ते पसार झाले होते. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलासरी पोलीस आता चोरट्यांच्या शोध घेत आहेत. विशेष म्हणजे मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत असलेल्या या वर्दळीच्या परिसरात झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.