![Valentine's Day Special : राणीने राजाच्या प्रेमासाठी बांधलेलं एकमेव प्रतीक; चंद्रपुरातील वास्तूचा थक्क करणारा इतिहास! Valentine's Day Special : राणीने राजाच्या प्रेमासाठी बांधलेलं एकमेव प्रतीक; चंद्रपुरातील वास्तूचा थक्क करणारा इतिहास!](https://c.ndtvimg.com/2025-02/ht877cr_chandrapur-_625x300_14_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Valentine's Day Special : प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहालचं (Tajmahal) नाव घेतलं जातं. शहाजहाने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजे मुमताजच्या स्मरणार्थ अत्यंत अतुलनीय स्मारकाची निर्मिती केली. परंतू एखाद्या प्रेयसीने किंवा पत्नीने आपल्या पतीसाठी बांधलेली भव्य वास्तू तुम्हाला माहिती आहे का? तर ही समाधी आज चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिराच्या परिसरात पाहायला मिळते. एका राणीने आपल्या राजावरील प्रेमाखात तब्बल 317 वर्षांपूर्वी एक वास्तू उभारली. आजही त्या वास्तूवर जाऊन प्रेमात असलेली मंडळी नतमस्तक होतात.
पतीवरील प्रेमासाठी उभारली समाधी
राणी हिराईने आपला राजा बीरशहासाठी ही समाधी बांधली. त्यामागी कहाणी अशी चंद्रपूरवर सतराव्या शतकात गोंड राजांचं राज्य होतं. त्यावेळी राजे बीरशहा हे शासक होते. राणी हिराई (Queen Hirai) आणि राजे बीरशहा यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. राजे बीरशहा यांची हत्या झाल्यानंतर सर्व कारभार राणी हिराईनं आपल्या हातात घेतला. पण राजाला विसरणं राणीला अशक्य झालं होतं. एकीकडे राज्य कारभार तर दुसरीकडे राजापासून कायमचा झालेला दुरावा. अशा अशा वेदनादायी परिस्थितीत राणी हिराईनं आपल्या प्रेमाच्या स्मरणार्थ भव्य समाधी (Tomb of Raja Birshah) उभारण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच एका राणीने राजासाठी बांधलेले देशातील पहिली वास्तू उभी राहिली. आज जिथं अंचलेश्वराचं मंदिर आहे, त्याच परिसरात राजा बीरशहाची समाधी बांधण्यात आली आहे.
नक्की वाचा - Rose Day 2025: कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय असतो अर्थ? जाणून घ्या माहिती
समाधी नाही प्रेमाचं प्रतीक...
जगप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती शहाजहाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली. इथं राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ समाधी बांधली आहे. राणी हिराईने समाधी तयार करण्यापूर्वी आधी दगडाचं मॉडेल तयार करून घेतलं. ते पसंत पडल्यानंतर समाधी उभारण्यात आली. आजही हे दगडाचं मॉडेल नागपुरातल्या वस्तू संग्रहालयात ठेवलेलं आहे. बीरशहाची समाधी ही सँड स्टोननं बांधली असून चुण्याची जुळवणी आहे. एखाद्या राजाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी समाधी आहे. त्यामुळं या समाधीचं प्राचीन वास्तू म्हणून महत्त्व तर आहेच, शिवाय प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या समाधीची विशेष ओळख आहे.
![Latest and Breaking News on NDTV Latest and Breaking News on NDTV](https://c.ndtvimg.com/2025-02/4k68tcig_chandrapur-_625x300_14_February_25.jpg?im=FaceCrop,algorithm=dnn,width=1200,height=738)
आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं विविध प्रकारे आपल्या प्रेमाची कबुली देतात तर आपलं किती प्रेम आहे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र महाराष्ट्रातील एका राणीने आपल्या पतीसाठी एक समाधी बांधली आणि ती अजरामर झाली. आजही व्हेलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रेमवीर येथे येतात आणि राजाच्या समाधीसमोर नतमस्तक होतात. स्थापत्य कलेचा अभ्यास करण्यासाठीही येथे संशोधक भेट देत असतात. आज एका राजा नाही तर राणीच्या प्रेमाची कहाणी सांगणारी वास्तू अनेक प्रेरणा देऊन जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world