मनोज सातवी
समुद्रावर मौजमजा करायला गेलेल्या दोन मित्रांच्या जीवावर बेतलं असतं. पण त्यांचे नशिब चांगलं म्हणून त्यांचे जीव वाचले. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने दिड तास मेहनत घेतली. त्यानंतर या दोघांचाही जीव वाचला. स्थानिक पोलिसांचीही त्यांना सोडवण्यात मदत केली. त्यानंतर या दोन्ही तरूणांना समज देण्यात आली. शिवाय भरती वेळी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहनही यावेळी पोलिसांनी केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रशांत राणा आणि दिव्यांश शर्मा हे दोघे मित्र आहे. हे दोघेही फिरण्यासाठी म्हणून वसईच्या समुद्र किनारी आले होते. हे दोघेही नालासोपाऱ्याचे राहणारे आहेत. ते दोघे ही वसईच्या भुईगाव समुद्र किनारी गेले होते. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. स्थानिकही इथं फिरण्यासाठी जातात. त्याच वेळी हे दोघे तरुण ही तिथेच होते. हे दोघेही गप्पा मारण्यासाठी समुद्रातल्या खडकावर बसले होते. संध्याकाळ झाली होती. भरतीची वेळही झाली होती. तरही ते दोघे तिथेच बसून राहीले.
भरतीचे पाणी वर येत होते. हळूहळू समुद्राच्या पाण्याने ते बसलेल्या खडकाला विळखा घातला. ते दोघेही तिथे अडकले. संध्याकाळ झाल्याने समुद्र किनाऱ्यावरही कोणी जास्त लोक नव्हते. स्थानिक तरुणांनी या दोघांना अडकलेलं पाहीलं. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि वसई पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल आणि पोलीस समुद्र किनारी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं.
जवळपास दिड तासाच्या परिश्रमानंतर या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. स्थानिक तरुणांनी ही यामध्ये मदत केली. या ठिकाणी फिरण्यासाठी येणारे पर्यटक अनेक वेळा खोल समुद्रात जातात. त्यातल्या काहींनी जीवही गमावला आहे. तर काही जण असे अडकून पडतात. त्यामुळे समुद्र किनारी येताना तिथले नियम पाळले जावेत असे आवाहन स्थानिक पोलिसांनी आणि रहिवाशींनीही केले आहे. पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं पोलीस उपनिरीक्षक भारतभूषण पगारे यांनी सांगितलं.