मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai News : वसई-पूर्व येथील वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदेश राणे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. राणे यांनी पदाचा गैरवापर करून स्थानिक लँड माफिया सुशील जैन याला मदत करत फिर्यादी दीपक गामी यांची जमीन जबरदस्तीने ताब्यात मिळवून दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असतानाही PSI राणे यांनी पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी जाऊन सुरक्षारक्षकांना धमकावले आणि जमिनीचे पझेशन लँड माफिया जैनला दिले. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून तक्रारीनंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, फिर्यादीचे वकील भास्कर झा यांनी या प्रकरणात फक्त संदेश राणेच नव्हे तर आणखी वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याचा आरोप केला आहे.
( नक्की वाचा : Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त! )
बनावट मार्कशीट रॅकेटमध्येही संशयित भूमिका
PSI संदेश राणे यांचे नाव वसईतील बनावट मार्कशीट रॅकेटमध्येही आल्याचे सांगितले जात आहे. फक्त 65 हजार रुपयांत तीन महिन्यांत कोणतीही पदवी मिळत असल्याच्या या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, विद्यापीठे आणि काही खासगी संस्था सामील असल्याचा संशय आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी या प्रकरणी PSI राणे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांच्याकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या कडून जीवाला धोका असल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
पुढील चौकशीवर लक्ष
निलंबित PSI संदेश राणे यांच्याविरोधात अनेक गंभीर तक्रारी आता पुढे येत आहेत. राणे यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्यानेच त्यांनी इतकी मजल मारली, स्थानिकांत चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या वरिष्ठांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.