मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai-Virar News : वसई–विरार–नालासोपारा परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून मृतदेह सापडण्याच्या घटनांची चिंताजनक मालिका सुरूच आहे. कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रविवारी सायंकाळी मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा परिसरात 45 ते 50 वयोगटातील अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासन कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहे का? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे मीरा-भाईंदर–वसई-विरार पोलीस आयुक्तालयात काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना बढती दिल्याच्या चर्चांमुळे प्रशासनाचा धाक कमी झाल्याची भावना स्थानिकांमध्ये वाढत आहे. परिणामी गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी ती वाढत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा आढावा घेतला असता, ही मालिका अधिकच धक्कादायक वाटते.
धक्कादायक घटनांची मालिका...
21 मार्च 2026 – शिरवली (विरार पूर्व)
कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला. तपासात पतीने खून केल्याचे उघड; आरोपी अटकेत.
23–24 मार्च 2026 – धानिवबाग, नालासोपारा
बेपत्ता 6 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; नागरिकांमध्ये संताप.
26–27 मार्च 2026 – पेल्हार फाटा, नालासोपारा
शिर छाटलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह; आर्थिक वादातून हत्या, आरोपी अटकेत.
मार्च अखेर 2026 – नालासोपारा पश्चिम (डी-मार्ट परिसर)
नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आव्हान.
30–31 मार्च 2026 – फुलपाडा, विरार
अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला; प्राथमिक तपास सुरू.
5 एप्रिल 2026 – विरार फाटा (मुंबई–अहमदाबाद महामार्ग)
45–50 वयोगटातील पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरू.
दरम्यान, या सलग घटनांपैकी अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक झाली असली तरी काही घटनांमध्ये अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
तर, दुसरीकडे भ्रष्टाचारचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून आपली प्रतिमा सुधारणे गरजेचे असताना, काशिमीरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यावर महिला हवालदार कमल चव्हाण यांना लाईट ड्युटीसाठी दरमहा 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकरणी ३० मार्च २०२६ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र असे असताना त्यांची पेल्हार पोलीस ठाण्यात बदली केल्याने चर्चाना उधाण आलं आहे. पोलीस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवणे, संवेदनशील ठिकाणांवर देखरेख मजबूत करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा वेगाने उलगडा करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.