निर्धार ही मनुष्याची सर्वात मोठी शक्ती आहे. एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की कोणतंही काम अशक्य नसतं. अनेक अवघड आणि अशक्य वाटणारी कामं पूर्ण होतात. त्यासाठी आवश्यक असलेलं धैर्य देखील आपोआप अंगी येतं. हैदराबादमध्ये मायलेकींनी दोन सशस्त्र दरोडेखोरांचा मोठ्या हिंमतीनं सामना केला. हे दरोडेखोर भर दुपारी घरात चोरीच्या उद्देशानं घुसले होते. या माय-लेकींनी दाखवलेल्या शौर्याचा पोलिसांनी गौरव केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अमिता मेहोत (वय : 42) आणि त्यांची मुलगी घरामध्ये होत्या. दुपारी दोन वाजता घराची बेल वाजली. घरातील मदतनीसानं दरवाजा उघडला. त्यावेळी दोन व्यक्तींनी आपल्याला पार्सल द्यायचं आहे, असं सांगितलं. त्यावेळी मदतनिसानं त्यांना बाहेर बसायला सांगितलं. त्यावेळी दोघांमधील सुशील या आरोपींपैकी बंदूक काढली. तर त्याचा सहकारी प्रेमचंदनं मदतनीसाच्या गळ्यावर सुरी ठेवली.
त्यानंतर दोन्ही दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी घरामधील सर्व मौल्यवान सामान आपल्याला द्यावं अशी मागणी केली. पण, त्यांना माय-लेकीच्या शौर्याचा अंदाज नव्हता. त्यांनी सुशीलला लाथ मारली आणि त्या मदतीसाठी ओरडल्या.
दोन महिला पळण्याचा प्रयत्न करत असलेल्या दरोडेखोराला पकडत आहेत, असं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यावेळी दरोडेखोरांमधील प्रेमचंदला शेजाऱ्यांनी पकडले. तर सुशील पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पण, त्याला नंतर पकडण्यात आले.
या दोन्ही आरोपींनी जवळपास एक वर्षांपूर्वी या कुटुंबासाठी काम केलं होतं. अमिता यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पोलीस उपायुक्त (उत्तर) रोहिणी प्रियदर्शनी यांनी अमिता आणि त्यांच्या मुलीचा सन्मान केला आहे.