नरेश सहारे, गडचिरोली
जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. राज्यभर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ही घडली. याप्रकरणी 14 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
जननी देवाजी तेलामी वय वर्ष 52 व देवू कटिया आतलामी वय वर्ष 70 अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलाने 60 वर्ष आणि मुलगा दिवाकर तेलामी वय वर्ष 28 यांचा समावेश आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे ते जादूटोणा करतात असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा 1 मे रोजी मृत्यू झाला.
(नक्की वाचा - आमदार किरण सरनाईक कुटुंबीयांच्या कारला अपघात 4 जणांचा मृत्यू)
मुलांचे मृत्यू जननी तेलामी आणि देवू आतलामी यांनी जादूटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबियांनी काही जणांना सोबत घेऊन 1 मे रोजी रात्री जननी आणि देवू यांच्या घरी गेले. त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले.
याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनदा याने पोलिसात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 14 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे यांनी दिली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
(VIDEO- सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, पाहा व्हिडीओ)
पाच महिन्यातील दुसरी घटना
जादूटोण्याच्या संशयावरून हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यातील दुसरी घटना आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती-पत्नी व त्यांच्या नातीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गाव सुद्धा ऐटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत आहे. त्या घटनेनंतर आता बारसेवाडा हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरला आहे.