उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पोलिसाच्या पत्नीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत सौम्या कश्यप हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने रडत रडत आपली आपबीती सांगितली आहे. या व्हिडीओत तिने सासरच्या मंडळींवर, पतीवर आणि दीरावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर या महिलेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, "मी मरत आहे, पण या लोकांनाही सोडू नका." या महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सौम्या कश्यपने रविवारी आपल्या खोलीत लावलेल्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती सौम्यांच्या घरच्यांना दिली. पोलिसांनी सांगितले की, घरच्यांनी तक्रार दिल्यानंतरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल. सौम्याचा पती, पोलीस कॉन्स्टेबल अनुराग सिंह, लखनऊच्या बीकेटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. घटनास्थळी पोलीस दल उपस्थित झाले होते. त्यांनी घटनास्थळावरून काही पुरावे ताब्यात घेतले आहेत.
नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण
या महिलेने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ती सासरच्यांवर मारहाणीचा आरोप करत म्हणते की, "हे लोक माझ्या पतीचे दुसरे लग्न करून देऊ इच्छित आहेत." तसेच ती म्हणाली की, "हे लोक म्हणतात की ही काहीच घेऊन आली नाही, हिला मारून टाका." व्हिडिओमध्ये महिला रडत रडत विनंती करत म्हणाली, "मी जर मेले, तर योगीजींना हात जोडून प्रार्थना आहे की, या लोकांनाही सोडू नका. तसेच, या लोकांकडे पैसे आहेत आणि हे काहीही करू शकतात. आम्ही मुली कुठे जावे आणि काय करावे? आजपर्यंत कुठेही न्याय मिळाला नाही." असं या व्हिडीओत ती म्हणते.
तिने आपल्या पतीवर आरोप करत म्हटले आहे की, "हा मला मारतो, मारहाण करतो आणि म्हणतो की मी पोलीस आहे, तू माझे काहीही करू शकत नाहीस. मी या लोकांच्या त्रासामुळे मरत आहे. यांनाही सोडू नका." असं तिने शेवटी या व्हिडीओत म्हटलं आहे. एडीसीपी नॉर्थ जितेंद्र दुबे यांनी सांगितले की, रविवारी बीकेटी पोलीस स्टेशनला मामपूर बाना गावात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या पोलिसाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक आणि उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर फिल्ड युनिटला बोलावून फॉरेन्सिक तपास केला. या प्रकरणात आवश्यक माहिती गोळा केली जात आहे, असं ही त्यांनी सांगितलं.