मनोज सातवी, प्रतिनिधी
Virar Double Murder Mystery : विरारच्या बोळींज परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या (Under Construction) इमारतीवरून पडून झालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागले आहे. ही आत्महत्या नसून त्यांची हत्या झाली असल्याचा गंभीर आरोप मृतांच्या वडिलांनी केला आहे. या तरुणांची हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा दावाही पालकांनी केला आहे.
श्याम सनद घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही नालासोपारा येथील रहिवासी होते. विरार बोळींज येथील गोविंद सुपर हाईट्स नावाच्या 18 मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता मृत तरुणांच्या पालकांनी केलेल्या आरोपांमुळे पोलिसांचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
वडिलांचा हत्येचा दावा आणि उपस्थित झालेले प्रश्न
मृत झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तरुणाच्या वडिलांनी हा प्रकार स्पष्टपणे हत्या असल्याचे म्हटले आहे. या दाव्यामागे त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील राष्ट्रीय खेळाडू अपघातात गंभीर जखमी; 10 महिने चालणेही मुश्किल, पण आरोपी मोकाटच! )
दोन्ही तरुणांचे मृतदेह इमारतीपासून सुमारे 18 ते 20 फूट अंतरावर आढळले. इतक्या उंचीवरून उडी मारल्यानंतर मृतदेह इतके दूर कसे फेकले गेले? सुरक्षा भेदून प्रवेश कसा?: इतक्या उंच आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या बांधकामस्थळी (Construction Site) हे दोन्ही तरुण आत कसे गेले? नालासोपारा येथे राहणारे हे तरुण विरारमधील या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत का आले? मृत्यूनंतर त्यांचे मोबाईल फोन कुठे आहेत? मृतदेहाजवळ ते आढळले नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
गोविंद हाइट्स' नावाच्या या बांधकाम प्रकल्पावर काही दिवसांपूर्वीपर्यंत लावण्यात आलेला बोर्ड अचानक काढून टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.
तिसरा मुलगा गायब
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन तरुणांसोबत तिसरा एक मुलगा देखील घटनास्थळी उपस्थित होता, जो या घटनेनंतर गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग आहे का, या दिशेनेही तपास करणे आवश्यक आहे.
विरार पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दोन्ही तरुणांचे मोबाईल फोन, गायब झालेला तिसरा मुलगा आणि पालकांचे हत्येचे दावे या सर्व गोष्टींचा पोलीस बारकाईने अभ्यास करत आहेत. ही घटना आत्महत्या आहे की, पालकांच्या आरोपानुसार प्रेमप्रकरणातून केलेली हत्या आहे, याचा अंतिम उलगडा पोलिसांच्या सखोल तपासानंतरच होणार आहे.