
Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध धावपटू आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू लक्ष्मण गुंडप यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरून दुचाकीने जात असताना एका भरधाव कारने त्यांना आणि त्यांच्या मुलाला धडक दिली आणि फरफटत नेले. या अपघाताला जबाबदार असलेला कारचालक घटनेपासून अजूनही फरार असून, डोंबिवली पोलीस त्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कसा झाला अपघात?
लक्ष्मण गुंडप हे डोंबिवली पूर्वेतील महात्मा गांधीनगर परिसरात राहतात. ते एक नामांकित धावपटू आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात. ते अनेक उदयोन्मुख धावपटूंना मोफत प्रशिक्षण देतात आणि त्यांनी अनेक खेळाडू तयार केले आहेत. हा अपघात काही दिवसांपूर्वी झाला, जेव्हा गुंडप आणि त्यांचा मुलगा जिमखाना रोडवरून क्रीडांगणावर जाण्यासाठी निघाले होते. मुलगा सायकलवर होता आणि गुंडप दुचाकीवर होते.
यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कार चालकाने प्रथम त्यांच्या मुलाला आणि नंतर गुंडप यांना धडक दिली. धडकेनंतर कारचालकाने त्यांना 15 ते 20 मीटर पर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी जखमी गुंडप आणि त्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गुंडप यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
उपचाराचा खर्च वाढणार?
गुंडप यांच्या पायाच्या उपचारावर आत्तापर्यंत 5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि उपचाराचा हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. त्यांना कमीतकमी 10 महिने चालता येणार नाही. या कालावधीत ते कोणालाही प्रशिक्षण देऊ शकणार नाहीत, ज्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य थांबले आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अपघात होऊन अनेक दिवस उलटूनही, डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस या बेदरकार कारचालकाला पकडू शकलेले नाहीत. पोलिसांनी कारचा नंबर मिळाल्याचे सांगितले असले तरी, "कार चालक सापडत नाहीये," असे त्यांचे म्हणणे आहे, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
"रस्त्यावर अनेक मुले सरावासाठी जात असतात, त्यांचाही अशाच प्रकारे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पोलिसांनी या बेदरकार कारचालकाला लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गुंडप यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world