मनोज सातवी, प्रतिनिधी
विरार पश्चिमेकडे एका पबच्या समोर तीन मद्यधुंद तरुणींना पोलिसांवर हल्ला केल्याचा आणि रात्री गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणी इतक्या नशेत होत्या की, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. शिवीगाळ करीत या तीनही तरुणींना रात्री उशिरा परिसरात गोंधळ घातला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वीही मद्यधुंद अवस्थेत पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा मुलींविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
विरार पश्चिमेकडील 'पंखा फास्ट' नावाच्या पबमध्ये दोन गटांतील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच काही मद्यधुंद तरुणींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद तरुणींनी महिला पोलीस कॉन्स्टेबलचे केस ओढून तिच्या हाताला चावा घेतला. तसंच मारहाण करत तिचा गणवेषही फाडला. एका पोलीस हवालदाराच्या डोक्यावर लोखंडी बादली घालून त्याला जखमी केलं आणि त्याच्याही मनगटाचा चावा घेतला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पबमध्ये धिंगाणा घालणाऱ्या 3 तरुणींना अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा - चेंडू काढण्यासाठी तलावात उतरले, अंदाज चुकला अन् जिवलग मित्रांनी जीव गमावला
विरारच्या 'पंखा फास्ट' या पबमध्ये रविवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. परंतु मद्यधुंद तरुणींनी पोलिसांच्या पथकावराच हल्ला केला. यावेळी काव्या प्रधान (22) या आरोपी तरुणीने महिला पोलीस अमंलदार उत्कर्षा वंजारी यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला. तसेच त्यांच्या हाताचा चावा घेतला तर अश्विनी पाटील (31) या तरुणीने त्यांचे केस ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये पुनम नावाच्या तरुणीचाही समावेश आहे.
यावेळी काव्या प्रधान नावाच्या तरूणीने पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यात लोखंडी बादलीच घातली आणि त्यांच्याही मनगटाचा चावा घेतला. तर पूनम नावाच्या तरुणीने देखील पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी पबमधील महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर पोलिसांच्या मदतीसाठी धावल्या, परंतु त्यांना देखील मारहाण करून त्यांचा टी शर्ट फाडण्यात आला. परिस्थिती आणखीनच चिघळत असल्यामुळे पोलिसांनी आणखी कुमक मागवून या तीनही बेभान झालेल्या मद्यधुंद तरुणींना ताब्यात घेतलं. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.