टेम्पो गाड्यांना उडवत गेला, वाडा भिवंडी महामार्गावर मृत्यूचं तांडव; तिघांचा मृत्यू

रस्त्याची दुरावस्था आणि अपघातांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या वाडा-भिवंडी महामार्गावर एका भरधाव टेम्पो चालकाने तीन मोटार सायकल आणि एका पादचाऱ्याला चिरडल्याचा प्रकार घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाडा:

प्रतिनिधी, मनोज सातवी

रस्त्याची दुरावस्था आणि अपघातांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या वाडा-भिवंडी महामार्गावर एका भरधाव टेम्पो चालकाने तीन मोटार सायकल आणि एका पादचाऱ्याला चिरडल्याचा प्रकार घडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एका महिलेवर ठाणे येथे उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून एका 14 वर्षीय अजित कलिंगडा मुलाची प्रकृती गंभीर आहे. इतर तीन जणांवर वाडा येथील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात अशोक कलिंगडा, अजिंक्य बोराडे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर  मृत अशोक कलिंगडा यांची पत्नी अलका कलिंगडा यांचा ठाणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टेम्पो चालक आनंद मेढेकर हा बोईसरहून भिवंडी येथे रिकामा टेम्पो घेऊन जात असताना अंदाजे रात्री 8.30 वाजताच्या सुमारास शिरीष फाट्याजवळ एका मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर टेम्पो चालक पळून जाण्याच्या  प्रयत्नात असताना काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला चालत असलेल्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भिवंडीच्या दिशेने पळत असताना त्याने अजून दोन बाईकस्वारांना उडविले. नेहरोली फाट्यावर बाईक स्वाराला उडवून टेम्पो चालक आनंद मेढेकर हा टेम्पोसह पलायन करीत असताना संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांना बोलवून त्यांच्या हवाली केले.

दरम्यान या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली असून अद्याप त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे.  रात्री उशिरा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी वाडा ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यावेळी ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांना ठाणे येथे जावे लागत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचा जीव जातो ही येथील नेत्याची उदासीनता असल्यामुळे आज मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.