- निलेश बंगाले, प्रतिनिधी
Wardha News: केवळ 50 रुपयांच्या क्षुल्लक उधारीवरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले. या प्रकरणी हिंगणघाट जिल्हा आणि सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला आजन्म कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पैशांच्या वादातून एकाचा जीव घेणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
50 रुपयांसाठी केली हत्या
मृत व्यक्तीने आरोपीच्या पत्नीकडून 50 रुपये उसने घेतले होते. ही किरकोळ रक्कम परत करण्यावरून आरोपी आणि मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आरोपीने जवळच असलेला लाकडी राफ्टर उचलला आणि मृतकाच्या डोक्यावर जोराने प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की, त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हिंगणघाट जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
शिक्षा: आजन्म कारावास (जन्मठेप)
दंड: 5,000 रुपये
(नक्की वाचा: Nagpur News: पतीने किचनमध्ये जाण्यापासून रोखलं... पत्नीने कोर्टात खेचलं, न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल)
क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात घेतलेला हा निर्णय एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारा ठरला, तर दुसरीकडे आरोपीला आता आपले संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार आहे.