20 मे 2024 रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील हे शेवटच्या टप्प्यातील मतदान असेल. यानिमित्ताने मतदानाची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं.
सांगली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर पैज लावलेल्या दोघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या दोन मित्रांनी सांगलीमधील लोकसभा निवडणुकीसाठी बुलेट गाडीची पैज लावली होती. हीच पैज त्यांच्या अंगलट आली आहे. पैज लावणाऱ्या दोघांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - हमालाला काम देण्यावरुन ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला; डोंबिवलीतील घटना
रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असं गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. शिरढोण येथील रमेश जाधव यांनी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील निवडून येतील आणि गौस मुलाणी यांनी विशाल पाटील निवडून येतील, अशी पैज लावली होती. त्यातून दोघांनी आपल्या बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती. पैज लावण्याबरोबरच त्यांनी पैजेचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणं दोन्ही मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे.