वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडुप येथील सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये टॉर्चच्या प्रकाशात एका महिलेची प्रसूती करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला. सिझेरियनदरम्यान महिला आणि तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे.
अचानक वीज गेली...
सुषमा स्वराज महापालिकेच्या प्रसूतिदरम्यान सोमवारी एका महिलेला प्रसूतिसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू असताना अचानक विजेचा प्रवाह खंडीत झाला. यानंतर शस्त्रक्रियागृहात अंधार पडला. काहीच पर्याय नसल्याने डॉक्टरांनी टॉर्चच्या साहाय्याने सिझेरियन पूर्ण केलं. मात्र या गोंधळात नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याशिवाय अतिरिक्त रक्तप्रवाह झाल्याने शस्त्रक्रियेनंतर महिलेचा ही मृत्यू झाला.
नक्की वाचा - पोलिसांची मोठी कारवाई, गोदिंयामध्ये उधळून लावला बालविवाह
या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूतिदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील जनरेटर नादुरुस्त असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वीज गेल्यानंतर सर्वत्र अंधार पसरला. महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मनपाच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी या प्रकरणात दहा महिला रोग विशेषतज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. पुढील आठवड्यापर्यंत तपास रिपोर्ट हाती येईल. यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.