
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : राज्य सरकार महिला सन्मानाचे गोडवे गात असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच बसमधून जबरदस्तीने उतरवून दिल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे मुर्तीजापूरजवळ शिवशाही बसमधूनही एका महिलेला तिकीट न देता मध्येच उतरवण्यात आले आहे. या दोन घटनांनी एसटी व्यवस्थेतील गलथानपणा आणि महिलांविषयीचा बेजबाबदार दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आहे. तर याबाबतचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
तिरोडा-अकोट बसमध्ये 7 जुलै रोजी वडाळी देशमुख येथील चार महिला बसल्या होत्या. तिकीट मशीन बिघडल्याचे कारण देत वाहक आर. आर. वाघमारे यांनी त्यांना अमरावतीजवळच जबरदस्तीने खाली उतरवले. महिलांनी विनवणी करूनही महिलांना अख्खी रात्र अमरावतीत काढावी लागली. तर दुसऱ्या एका घटनेत अमरावती ते मूर्तिजापूर प्रवास करणाऱ्या शिवानी श्रीराव यांना अमरावती-बुलढाणा शिवशाही बसमधून बडनेरा स्थानकावर उतरून देण्यात आलं.
नक्की वाचा - Mumbai Police : मोबाइल चोरीचा आरोप, शेफची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या; अनेक सवाल अनुत्तरित..
बस ही मूर्तिजापूरला थांबणार असल्याचं लिहिलं असल्यानंतरही शिवशाही बसच्या कंडक्टरने या तरुणीला मूर्तिजापुरचा तिकीट न देता बडनेरालाच उतरवलं. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये संताप उसळला असून दोन्ही वाहकांवर तत्काळ निलंबन आणि कडक कारवाईची मागणी होत आहे.
.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world